मासरुळ : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे़, तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद केले आहेत़ प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले असले तरी ४ मे राेजी मासरुळ येथे आठवडी बाजार भरला हाेता़ याविषयी माहिती मिळताच पाेलिसांनी गावात भेट देऊन ९ जणांवर दंडात्मक कारवाई केली़ पाेलिसांनी कारवाई करून हा बाजार उठवला़
वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत़ जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत, तसेच ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत़ ग्रामपंचायतच्यावतीने दवंडी देऊनही मंगळवारी मासरुळ गावात काही व्यापाऱ्यांनी बाजारात दुकाने लावली़ याविषयी माहिती मिळताच ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ठाणेदारांनी गावात भेट दिली़ यावेळी आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या नऊ जणांना दंड करण्यात आला़ तसेच पुढील मंगळवारचा आठवडी बाजार भरवल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा ठाणेदार मुंडे यांनी दिला़ ठाणेदार येताच बाजारातील नागरिकांची तारांबळ होताना दिसून आली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकलेला भाजीपाला शासन नियमाचे पालन करून विकावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले.