किनगाव जट्टू येथील आठवडी बाजार गावातच मध्यभागी रस्त्यावरच भरत असतो. येथील बाजारात परिसरातील व्यापारी व ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात; परंतु एक ते दीड महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या आजाराने थैमान घातल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याचा फैलाव रोखण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाच्या वतीने पूर्वसूचना म्हणून गावात दवंडी देऊन बुधवारी आठवडी बाजार बंद असल्याचे सूचित केले हाेते. त्यामुळे व्यापारी व ग्राहक बाजाराकडे फिरकले नसल्याने बाजारगल्लीत शुकशुकाट होता. तसेच अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने आठवड्यातून शनिवारी व रविवारी बंद ठेवून इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे दवंडीद्वारे सूचित केले आहे. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आठवडी बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:44 AM