लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पावलावर नतमस्तक होण्यासाठी अख्खा महाराष्ट्र नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त पंढरपूरला आषाढी, एकादशीला जातात. त्याच उदात्त भावनेतून तालुक्यातील हजारो भाविक पंढरपूरला गेले होते. आषाढी एकादशीला शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्र्यांसोबत एका जोडप्याला मिळतो. ते भाग्य बाळसमुद्र येथील मेरत दाम्पत्याला मिळाल्याने बाळसमुद्रवासीयांच्या आनंदाला उधाण आले. ६ जुलै २०१७ रोजी ११ वाजता गावात त्यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचे मनोभावे स्वागत करून भव्य मिरवणूक काढली.मेरत दाम्पत्य बुधवारी रात्री पंढरपूर येथून जालना आणि जालना येथून बाळसमुद्र येथे सकाळी ११ वाजता बसने येताच ग्रामस्थांनी त्यांचे मनोभावे पूजन, औक्षण, हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाटीपासून टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक महिलांनी अंगणात रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत केले. परसराम आणि अनुसया यांना पांडुरंगाने दर्शन दिल्याची भावना व्यक्त करून त्यांचे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी दर्शन घेतले. वारकरी परंपरा जोपासणाऱ्या या छोट्याशा गावातून १७० भाविक यावर्षी पंढरपूरला गेले होते. स्व.साहेबराव मेरत यांनी तब्बल ४८ वर्षे वारी केली होती. त्यांच्याच घराण्यातील हे दाम्पत्य असून, गेल्या १० वर्षांपासून तेही नियमित वारी करीत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी दत्तात्रय मेरत, पंजाबराव मेरत, नितीन मेरत, श्रीकृष्ण मेरत, श्रीकृष्ण आटोळे, देवराव मेरत, आसाराम मोरे, संजय मेरत, लक्ष्मण मेरत, रितेश नाझरकर, विनोद वायाळ, विजय मेरत, तेजराव मेरत, विठ्ठलराव गायकवाड, मनोहर बुंधे, नंदू शिंगणे, सय्यद पठाण, नकूल शिंगणे यांच्यासह गावकऱ्यांनी पायघड्या घातल्या होत्या.
टाळ-मृदंगाच्या निनादात मेरत दाम्पत्याचे स्वागत
By admin | Published: July 07, 2017 12:15 AM