जवळपास २०१२ पासून हा उपक्रम सुरू होता. दर गुरुवारी सरकारी दवाखाना परिसरात बुलडाण्यातील गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात येत असते. सरकारी दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांना दवाखान्यात भोजन मिळते; पण रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखान्यात थांबणाऱ्या नातेवाईकांना भोजन मिळत नाही. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांची भोजनाची आबाळ होते, ही बाब सुरेश गट्टाणी यांच्या लक्षात आली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून २०१२ पासून गजानन महाराज भक्तांच्या माध्यमातून अन्नदानाचा उपक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू केला होता.
सध्या कोरोनाच्या नियमावलीमुळे अन्नदानाच्या उपक्रमात खंड पडला असल्याने गजानन महाराज भक्तमंडळींच्या भेटीगाठी होत नव्हत्या व खंडित पडलेल्या अन्नदानाच्या उपक्रमावर चर्चा विनिमय व नवीन वर्षाचे स्वागत सहभोजन करून करावे, असा मनोदय भक्तांनी व्यक्त केल्याने शारीरिक अंतराचे व कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आतापर्यंत गजानन भक्तमंडळी व समाजातील विविध अन्नदात्यांच्या माध्यमातून जवळपास ४८ लाख रुपयांचे अन्नदान नि:स्वार्थपणे करण्यात आले आहे. समाजातील दानशूर त्यांच्या वाढदिवस तथा तत्सम कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा कोणतेही कारण नसताना या अन्नदानाच्या कार्यक्रमास सढळ हाताने मदत करत असतात.
अखंडित ३६८ आठवडे म्हणजे साडेसात वर्षांपासून चालत असलेला हा उपक्रम कोरोनाच्या नंतर पुढेही सुरू करण्याचा निर्धार यावेळी गजानन महाराज भक्तांनी व्यक्त केला. दरम्यान, बुलडाणा येथील पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजीराव देशमुख यांनी ८३ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुरेशचंद्र गट्टाणी, प्रा. गोपालसिंह राजपूत, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, त्रिलोकचंद चांडक, बजरंगलाल सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.