फिर्यादी पुंडलिक केशव सुरडकर (७२) यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३ जुलै २०२१ रोजी फोन पेवरून वीजबिल भरण्याचा प्रयत्न केला असता तीन वेळा फेेल म्हणून रिप्लाय आला. त्यानंतर सायंकाळी तीन वेळा ८४३ रुपये प्रमाणे पैसे खात्यातून कटल्याचे मसेज आले. म्हणून फिर्यादीने तीन वेळा ८४३ रुपये कटल्याची तक्रार फोन पेवर केली. तेव्हा फोन पे वरून सांगण्यात आले की, तुमचे पैसे ७ जुलैपर्यंत परत खात्यात जमा होतील. फिर्यादीने ७ जुलैपर्यंत वाटही पाहली, मात्र पैसे जमा झाले नाही. ८ जुलै रोजी फोन पेचा क्रमांक शोधून फोन केला तेव्हा फिर्यादीस तीन जणांनी वेगवेगळ्या वेळेत सतत फोन केले. शेवटी त्यांनी ‘तुम्हाला जमत नाही म्हणून सुरक्षित एखाद्या मुलाला शोधा असे सांगितले. थेाड्यावेळाने परत त्यांचा फोन आला. या वेळेस बँकेच्या पासबुकची विचारणा केली. फिर्यादीने आधी नकार दिला. त्यांनी एटीएमचा नंबर मागितला, तुमच्या एटीएमला पैसे टाकतो सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइलवर पहिला ओटीपी आला. तो फिर्यादीने सांगितल्यानंतर पुन्हा दोन वेळा ओटीपी आला. त्यांनी ओटीपी घेऊन प्रथम २४७०९ रुपये, दुसऱ्या वेळी २४६२५ रुपये असे तीन वेळा एकूण ७३ हजार ९५९ रुपये फिर्यादीच्या खात्यातून वळती केले. पैसे खात्यातून कमी हाेताच फिर्यादीची फसवणूक झाल्याचे त्यांना बँकेने फोनद्वारे कळविले. फिर्यादीने ९ जुलै रोजी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. शहर पोलिसांनी हे प्रकरण सायबरकडे वळती केले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत याप्रकरणी १२ सप्टेंबर रोजी माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
ऑनलाइन वीजबिल भरायला गेले, अन फसवणूक करून बसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:40 AM