- अनिल गवई
खामगाव : जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच पाश्चात्य देशांमध्येही या संस्कृतीचे अनुकरण होत आहे. भारतात मात्र, विपरीत परिस्थिती दिसून येते. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीवर मोठे आघात होताहेत, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, अशी खंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती राधादीदी यांनी व्यक्त केली. खामगाव येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांनी स्थापन केलेल्या ‘तपोवन’ला भेट देण्यासाठी त्या खामगाव येथे आल्या असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्यांबाबत त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले. जगात प्रत्येकाला शांतता हवी असल्याने, भारतीय संस्कार आणि योग संस्कृतीला डोक्यावर घेतले जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रश्न: मनुष्य जीवनात संस्काराचे महत्व काय?उत्तर: सतशील आचरण हा भारतीय संस्कृतीतील महत्वपूर्ण पैलू आहे. त्यामुळेच कदाचित जगातील इतर संस्कृती आणि समाजव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. दातृत्व हाच भारतीय संस्काराचा गाभा असल्याने मानवी जीवनात आजही संस्काराचे अनन्यसाधारण महत्व आहे.
प्रश्न: चंगळवादाचा भारतीय संस्कृतीवर विपरीत परिणाम होतो का?उत्तर: निश्चितच, भौतिक आणि चंगळवाद ही पाश्चिमात्य संस्कृतीची देणं मानली जाते. मात्र, हल्लीच्या काळात भारतीय समाजमनावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे मनुष्य भरकटल्या जात आहे. तमाम भारतीयांसाठी ही बाब निश्चितच भूषणावह नाही.
प्रश्न: भारतीय संस्कृती श्रेष्ठ असल्याचे परिमाण काय?उत्तर: भारतीय ऋषी, मुनी, संत आणि मंहतांनी त्याग आणि समर्पणातून भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे नेला आहे. भारतात पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असतानाच, दुसरीकडे पाश्चिमात्य देशात भारतीय संस्कृतीचे अनुकरण केल्या जात आहे. ही भारतासाठी गौरवास्पद बाब आहे. भूतदयेबाबत आजही भारतीयांच्या मनात संवेदना जीवंत आहे, हेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आहे.
प्रश्न: समाजातील गुन्हेगारीला कसा आळा बसेल?उत्तर: जगातील सगळ्याच चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात. संस्कारही आत्मसात करावे लागतात. याउलट चोरी, लबाडी मनुष्य आपोआपच शिकतो. यासाठी त्याला कुठल्याही संस्कारवर्गात जाण्याची गरज नाही. शॉर्टकटच्या नादात समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. लालसेमुळे समाजात विकृतताही वाढीस लागली आहे, ही वस्तुस्थिती असली तरी, कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून गुन्हेगारीकरण रोखणे सहज शक्य आहे.
प्रश्न: संस्कार मूल्य रुजविण्यासाठी स्वामी विवेकानंद केंद्राचे योगदान काय?उत्तर: भारतीय समाजमनात संस्कार मूल्याची रूजवण करण्यासाठी आसामसह देशातील विविध राज्यात कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. बालक, युवा आणि महिलांच्या सर्वागिंण विकासासाठी स्वामी विवेकानंद केंद्राचे जीवन सेवाव्रती अहोरात्र झटत आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत शिक्षणाचीही सुविधाही केंद्राच्यावतीने उपलब्ध करून दिल्या जात आहे.
प्रश्न: युवा वर्गासाठी आपला संदेश काय?उत्तर: युवक हेच या देशाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. बलशाली भारत घडविण्यासाठी युवकांनी मनभेद आणि मतभेद विसरून संघटीत होणे काळाची गरज आहे. मोह, माया आणि लालसा या त्रिसुत्रीने कुणाचंही भलं झालं नाही, हाच प्रमुख संदेश आपला ‘लोकमत’च्या माध्यमातून राहील!