त्वरित निर्णय घ्यावा : परीक्षा घेण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आग्रही
बुलडाणा : कोरोना संकटामुळे बारावीची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आताही कोरोना संकट पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तर परीक्षेवर काय पर्याय होऊ शकतो याची चाचपणी शिक्षण विभाग तसेच शासन करीत आहे. काहीही करा पण एकदाचा निर्णय घ्या, अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातीलर टर्निग पाॅईंट असतो. मात्र यंदा कोरोनाचे संकटामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रथम ऑनलाईन अभ्यासक्रम, त्यानंतर काही दिवसांनी कॉलेज सुरू झाले. मात्र नियमित वर्ग भरलेच नसल्याने अनेकांच्या डोक्यावरून अभ्यासक्रम गेला. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती तर बिकट आहे. अनेकांकडे स्मार्ट फोन नव्हते तर काहींच्या गावामध्ये नेटवर्क समस्या कायमचीच होती. त्यातच परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात गती घेतली. मात्र दोन वेळा परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा उत्साह गेला. आता तर अनेकांना काय शिकलाे हेसुद्धा आठवत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पास करता येते, असेही काही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.तर काही शिक्षणतज्ज्ञांनी परीक्षा घ्यायलाच हवी, अशी भूमिका मांडली आहे़
विद्यार्थ्यांच्या जीवनात इयत्ता १२ वीचे वर्ष महत्त्वाचे असते़ येथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते़ त्यामुळे शिक्षण विभागाने ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची गरज आहे़ पुढील प्रवेशासाठी गुणांची गरज असते़ त्यामुळे परीक्षा हाेणे गरजेचे आहे़ काेराेनाविषयक नियमांचे पालन करून परीक्षा ऑफलाईन घेता येऊ शकतात़
डाॅ़ नीलेश गावंडे, प्राचार्य तथा शिक्षणतज्ज्ञ
सध्या काेराेनाची दुसरी लाट सुरू आहे़ तिसऱ्या लाटेचा धाेका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला प्राधान्य देऊन परीक्षा रद्द करणे उचित ठरणार आहे़ आधीचे रेकाॅर्ड पाहून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येऊ शकते़ तसेच परीक्षा ऑनलाईन घेतल्यास तरी साधने नसल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहे़
डाॅ़ श्रीराम येरणकर, शिक्षणतज्ज्ञ
बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहिजे, असे मला वाटत़े विविध विद्याशाखांमध्ये प्रवेश करण्यासाठी बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते़ त्यामुळे बारावीच्या परीक्षा घ्यायलाच पाहिजे़ काेराेनाची भीती पाहता या परीक्षा ऑफलाईन घेता येतील़ परंतु, बारावीच्या गुणांवरच पुढील प्रवेश अवलंबून असल्याने परीक्षा घेण्याची गरज आहे़
डाॅ़ विजयकुमार शिंदे, प्राचार्य, डायट
कोरोना संकटामुळे कॉलेज पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला. दिवाळीनंतर परीक्षेची चांगली तयारी केली. मात्र पुन्हा कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता जून महिना येत असतानाही परीक्षा झाल्या नाही. शिक्षण विभागाने यावर त्वरित तोडगा काढावा.
अश्विनी भालेराव, विद्यार्थिनी
काॅलेजमधील शिक्षकांनी भरपूर मेहनत घेत ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे़ परीक्षेची तारीखही निश्चित झाली होती. कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. आता मात्र अभ्यास करणे कंटाळवाणे झाले आहे. किती दिवस अभ्यासात रहावे, असा प्रश्न पडला आहे़ शासनाने त्वरित परीक्षेविषयी निर्णय घ्यावा़
पल्लवी तायडे, विद्यार्थिनी
शिक्षण विभागाने दहावीप्रमाणेच परीक्षा रद्द करावी़ तसेच मागच्या वर्षी झालेल्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करावा़ काेराेनामुळे अभ्यास झाला नाही़ काॅलेजही करता आले नाही़ अशातच परीक्षा दिल्यास नापास हाेण्याची भीती आहे़ ऑनलाईन परीक्षा देणेही शक्य नाही़
सागर जाधव, विद्यार्थी