कोरोनामुळे उद्भवली बिकट परिस्थिती : प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट घोंगावत आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम आदी सेवाभावी संस्थादेखील यामुळे अडचणीत आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झराही आटल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनस्तरावरूनही अशा दुर्लक्षित घटकाकडे कानाडोळा केला जात असल्याने संबंधितांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बुलडाणा शहरात यशोधाम शिशूगृह आहे. सामाजिक दातृत्वातून लव ट्रस्टच्या वतीने हे अनाथालय चालविण्यात येते. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील उपेक्षित बालकांना येथे प्रवेश दिला जातो. या अनाथालयाला समाजातील काही दानदाते स्वत:हून मदत करीत असत. मात्र, कोरोनामुळे येथील दातृत्वाचा झरा आटला आहे. त्यामुळे अनाथालय चालविताना निश्चितच काही अडचणी येताहेत. परंतु, संस्थेच्या वतीने पोटतिडकीने हा उपक्रम चालविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, भटक्या मुलांच्या निवासी शाळाही बंद असल्याने अनाथ, निराधारांनी नेमके खायचे काय, असा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे.
चौकट..
अनुदानावरील संस्थांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात अनाथ, निराधार, अंध, दिव्यांग व्यक्ती व मुलांचे पालनपोषण करणाऱ्या विनाअनुदानित व कायम (विनाअनुदानित संस्था गत वर्षभरापासून अडचणीत सापडल्या आहेत; पात्र अनुदान मिळत असलेल्या संस्थांनीही अडचण भासवून अनाथ, निराधारांचे पालन-पोषण करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चौकट...
भिकाऱ्यांचीही उपासमार
पूर्वी बसस्थानक, रेल्चेस्थानक, बाजारपेठ, मंदिरानजीक बसून भीक मागणाऱ्या व या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या भिकाऱ्यांना अनेकांनी भीक देणे बंद केले. यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ ओढवली आहे.
प्रशासनाचा कानाडोळा
कोरोनामुळे विविध घटकांवर परिणाम झाला आहे. विशेषत: निराधार, निराश्रित, अंध, दिव्यांग व्यक्तींना कोणीच वाली उरला नाही. असे असताना त्यांच्या समस्यांकडे प्रशासनही कानाडोळा करीत आहे.
- कोट
समाजातील दानशूर आणि सेवाभावी व्यक्तींच्या मदतीने यशोदाधाम अनाथालय चालविण्यात येते. गत वर्षभरापासून येथील मदतीचा ओघ कमी झाला आहे. कोरोनाकाळात अनेक समस्यांचा डोंगर संस्थेपुढे उभा आहे. शासनाकडून कोणतीही मदत संस्था घेत नाही.
- कल्पना देशपांडे
पर्यवेक्षिका, यशोदाधाम अनाथालय, बुलडाणा
-----------