ब्रह्मानंद जाधव
मेहकर : तालुक्यातील खंडाळा गावात नऊ गाई आणि एक गोऱ्हा अचानक दगावल्याने पशुपालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. १० गुरांच्या या मृत्यूचे गूढ काय? यापासून पशुसंवर्धन विभागही अनभिज्ञ आहे.
मेहकर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून १३९ गावे आहेत. या सर्व खेड्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे २२ डॉक्टर कार्यरत असून हे सर्व डॉक्टर ग्रामीण भागात जात नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्याची वेळीच तपासणी होऊ शकत नाही. एकट्या खंडाळा गावात आत्तापर्यंत नऊ गाई, एक गोरा असे दहा जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
खंडाळा गावचे विद्यमान सरपंच रतन शिवाजी मानगले यांनी त्यांच्या गावात कार्यरत असलेल्या पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर प्रभाकर हरणे यांना जनावराचे आजारी असल्याच्या कारणाने अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जर पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर गावात असते, तर चार महिन्यात गुरांच्या मृत्यूला राेखण्यात यश आले असते. रतन शिवाजी मानघाले यांच्या मालकीची एक गाय १६ ऑक्टोबर रोजी दगावली. त्यानंतर १७ ऑक्टोबरला पुन्हा त्याच गायीचा गोऱ्हा मृत्यूमुखी पडला. या दोन्हीची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये आहे.
गावातील अनेक पशुपालकांचे गुरे दगावल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसात संबंधित डॉक्टरांवर कार्यवाही न झाल्यास आपल्याकडील सर्व जनावरे पशुधन विकास अधिकारी आनंदा आस्वार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील.- रतन मानघाले, सरपंच, खंदाळा देवी.
संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. यासंदर्भात चौकशी करून लवकरच कारवाई करण्यात येईल.-आनंद आस्वार, पशुसंवर्धन विकास अधिकारी, मेहकर.
पशुपालक संकटातमेहकर तालुक्यातील पशुपालकांचे लम्पीने मोठे नुकसान झाले आहे. त्यात खंडाळा येथे गत काही दिवसांपासून गुरांचे मृत्यू वाढले आहेत. दोन दिवसात दोन गुरे दगावल्याने पुन्हा पशुपालकांची चिंता वाढली आहे. गुरांच्या उपचारासाठी पशुसंवर्धन विभागही अपूरा पडत असल्याचे दिसून येते.