खामगाव (बुलडाणा): राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना २0१४-१५ अंतर्गत रब्बी हंगामातील पिकासाठी विमा संरक्षण म्हणून पीक विमा योजना भरण्याची शासनाकडून मान्यता आहे. या पीक विमा योजनेत जिल्ह्यातील गहू (बागायत, जिरायत), हरभरा व करडई या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. पावसाने कृपा केली तरच भरघोस उत्पादन शेतकर्यांना मिळते. कधी अतवृष्टीमुळे तर कधी अपुर्या पावसामुळे, गारपिटीमुळे, रोगराईमुळे उत्पादनात घट येते. या परिस्थितीत शेतकरी किफायतशीर शेती करू शकत नाही. बँकेकडून घेतलेले पेरणीचे कर्जही फेडू शकत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाने पूर्वीची सर्वंकष पीक विमा योजना बंद करून सुधारित नवीन राष्ट्रीय पीक विमा योजना सन १९९९-२000 पासून लागू केली आहे. आपत्तीसमयी शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यामध्ये मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतात. पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना ५0 टक्के पीक विमा हप्त्यात अनुदान राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गहू (बागायत) पीक विमा योजनेत तेराही तालुक्यांचा समावेश आहे. तर गहू (जिरायत) पीक विमा शेगाव, मेहकर, लोणार तालुक्यासाठी राहणार आहे. हरभरा पिकासाठी चिखली, बुलडाणा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव व नांदुरा या दहा तालुक्यांना समाविष्ट केले आहे. करडई पिकाचा विमा चिखली, बुलडाणा, मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यासाठी लागू होणार आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा पीक विमा संरक्षणासाठी शेतकर्यांनी पेरणीपत्र व सातबारा तलाठीकडून घेऊन ज्या बँकेत शेतकर्यांचे खाते असेल त्या बँकेत विहित नमुन्यातील अर्जासह पीक विमा रकमेचा बँकेत भरणा करावा, असे तालुका कृषी अधिकारी एम.डी. जाधव, तालुका कृषी अधिकारी, खामगाव यांनी सांगीतले.
गहू, हरभरा व करडईला मिळणार विमा संरक्षण
By admin | Published: November 05, 2014 11:52 PM