बुलडाणा : कोरोनामुळे गत एक वर्षांपासून उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर परत गेल्याने कामगारांचीही वाणवा जाणवत आहे.
खामगाव शहरात मोठी औद्योगिक वसाहत असून, अनेक उद्योग आहेत. मात्र, गत एक वर्षापासून उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. एमआयडीसीत प्रामुख्याने ऑईल मिल व दालमिल आहेत. मात्र, हे व्यवसायही नुकसानात असल्याने आठ ते दहा ऑईलमिल व दालमिलच सुरू आहेत. अनेक कंपन्यांनी उत्पादन अर्धे केले आहे. तसेच अनेकांनी कर्ज घेतल्यामुळे त्याची परतफेड करणे शक्य होत नाही. दुसरीकडे बॅंका तगादा लावत आहे.
कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील आहेत. हे सर्व कामगार परत गेले आहेत. या कामगारांना कंपनीत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे काम लवकर व सुरळीत होते. मात्र हे कामगार परत गेले आहे. त्यामुळेही अनेक उद्योजकांना मजुरांची टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे स्थानिक मजुरांना काम मिळत नाही. स्थानिक मजूर कामाच्या शोधात आहेत. मात्र, या मजुरांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागणार असल्याने उद्योजकही त्यांना रोजगार देण्यास धजावत नाहीत.
कोरोनामुळे मजूरवर्गावर अत्यंत बिकट परिस्थिती आली आहे. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक कंपन्या बंद आहेत. दुसरीकडे कुठेही काम मिळत नाही. काही कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये काम सुरू आहे. कमी कामगारांना आता अधिक काम करावे लागत आहे. आगामी दहा दिवस आणखी कडक लाॅकडाऊन लागल्यामुळे मजुरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
- राजेश बन्सोड, कामगार, खामगाव
गत एक वर्षापासून कंपनी बंदच आहे. कोरोनामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे आर्थिक चक्रच बिघडले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे ठिबक विकत घेण्यास शेतकरी तयार होत नाहीत. ठिबक लावणे आवश्यक नसून, नंतरही लावता येते. त्यामुळे शेतकरी फक्त आवश्यक वस्तूच खरेदी करीत आहेत. मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे यावर्षी उत्पादनच बंद ठेवले आहे. फक्त कृषी सेवा केंद्रच सुरू असून, बियाणे व औषधींचीच विक्री सुरू आहे.
- अजय खाकरे, ठिबक निर्माते, खामगाव
कोरोनामुळे गत एक वर्षापासून व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. उद्योगांची स्थिती अत्यंत खराब आहे. सर्वच उद्योजकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. केवळ मजुरांना मजुरी देण्याकरिता काही वेळांकरिता कंपनी सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ज्यांनी मालाची ऑर्डर दिली आहे. तेही माल घ्यायला तयार नाहीत. कच्चा मालही मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना नुकसानाची सामना करावा लागत आहे.
- मोहन टावरी, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन, खामगाव
कच्चा माल मिळण्यात अडचणी
उद्योजकांना कच्चा माल मिळण्यातही अनेक अडचणी येत आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची वाहतुकीवरही बंधने आली आहेत. तसेच सर्वत्रच उद्योगधंदे अडचणीत आल्याने कच्चा माल उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांकडूनही कमी प्रतिसाद मिळत आहे. काही उद्योजक परराज्यातून कच्चा माल बोलावतात, मात्र, लाॅकडाऊमुळे त्यातही अनेक समस्या येत आहे.