धावत्या बसचे चाक निखळले:; सुमारे ७० प्रवासी थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 5:08 PM
सुमारे ७० प्रवासी थोडक्यात बचावले
जळगाव जामोद: धावत्या एसटी बसचे चाक निखळून पडल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव परिसरात घडली. सुदैवानी बस नियंत्रणात आल्याने सुमारे ७० प्रवासी यातून थोडक्यात बचावले. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रवाशांनी हा थरार अनुभवला.शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम.एच. ०७ सी ९४९८ जळगाव जामोद येथून बुलडाण्यासाठी निघाली. सध्या जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता प्रचंड खराब झाला आहे. दरम्यान ७० प्रवाशी निघालेल्या बसचे डाव्या बाजूचे मागील चाक अचानक निखळून पडले. त्यामुळे आतील प्रवाशांना मोठा झटका बसला. चालकाने प्रसंगावधान राखून लगेच एसटी बस बाजूला उभी केली. यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे दुसरे चाकही निखळून पडण्याच्या अवस्थेत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कदाचित दुसरे चाक निखळून पडले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती.निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर!एसटी बसचा प्रवास सुरक्षित समजल्या जातो, त्यामुळे अनेकजण विश्वास ठेवून एसटी बसनेच प्रवास करतात. मात्र आगारातून निघालेली बस काही अंतरावरच दुर्घटनाग्रस्त होते. यावरून आगाराचे बसेसवर काही नियंतत्रण नसल्याचे दिसून येते. अनेक एसटी बसेस भंगार झाल्या असून हा एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळच आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून दोषी कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी अपघातग्रस्त बसने प्रवास करणारे शशांक दाते यांच्यासह प्रवाशांनी केली. (प्रतिनिधी )