लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शाळेच्या भिंतीची केवळ रंगरंगोटीच न करता त्यावर आकर्षक असे बोलके चित्र रेखाटल्याची किमया जिल्हा परिषद शाळा हिवरा साबळे येथे पाहावयास मिळते. आकर्षक चित्र असलेल्या ह्या शाळेच्या भिंती मुलांचे सवंगडीच बनल्याचे दिसून येते. एक छोटीशी टुमदार आणि लक्षवेधी असलेल्या या शाळेने आपली पटसंख्या सुद्धा ४७ वरून ६८ वर पोहचवली आहे.मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे ह्या गट ग्रामपंचायत असलेल्या छोट्याश्या गावातील शाळा आज लक्षवेधी ठरत आहे. बोरकर ह्या उत्साही शिक्षकांच्या पिढी नंतर ज्ञानेश्वर तायडे, विलास कपाळे आणि ठोंबरे ह्या शिक्षकांनी हिवरा साबळेच्या शाळेला प्रगतीच्या दिशेने अग्रेसर केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा, शाळेच्या आवारात ग्रामस्थांच्या मदतीने बसवून घेतलेले पिव्हर ब्लॉक, चौफेर पक्की संरक्षण भिंत गर्द हिरवी झाडी ह्या सर्वामुळे शाळा लक्षणीय होतीच. २०१८ मध्ये येथे आलेले कृतिशील शिक्षक किरण शिवहर डोंगरदिवे आणि हर्षवर्धन लक्ष्मण कंकाळ ह्यांनी शाळेला चैतन्यमय करण्याचा आणि गावातील विद्यार्थी आणि पालक जे कॉन्व्हेंट संस्कृतीकडे वळले, त्यांना गावातील शाळेकडे आकर्षित करण्याचा ध्यास घेतला. २०१८ मध्ये जी शाळेची पटसंख्या ४७ वर होती ती ६८ झाली आहे. येथील दोन्ही शिक्षक प्रामाणिकपणे आपले कार्य करत आहेत. शाळा आकर्षक करण्यासाठी शाळेच्या भिंतीवर वेगवेगळे वाचनीय आणि लक्षणीय चित्रकाम एक जमेची बाजू आहे.शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे सहकार्य ह्या शाळेच्या प्रगतीसाठी लाभत आहेच. माझे सहकारी शिक्षक किरण डोंगरदिवे यांच्या सहकार्याने शाळेचा स्तर आणखी उंचावेल.-हर्षवर्धन कंकाळ, मुख्याध्यापक
कृतिशील शिक्षक आहेत. गैरहजर राहणारे विद्यार्थीही आता शाळेकडे वळले आहेत. शाळा आयएसओ मानांकित होईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.-लक्ष्मी विष्णू साबळे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.