लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनलाॅक करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात शाळा कधी अनलॉक होणार याची उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांना लागली आहे. परंतु याबाबत शासनस्तरावरून निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन आणि कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविल्यास शाळा अनलॉक केल्या जाऊ शकतात. सध्या तरी याबाबत निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषद, खासगी, विना अनुदानित शाळा दीड वर्षापासून बंद आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मध्यंतरी नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्ग पुन्हा बंद करण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामळे पॉझिटिव्हिटी रेट ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार राज्य शासनाने अनलॉकचे स्तर निश्चित केले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्हाही आता अनलॉक झालेला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, शासनस्तरावर शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाचा शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय कधी होतो, याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
शासन निर्णयानंतर होणार अंमलबजावणी२८ जून रोजी शाळा सुरू करण्यात येतील. मात्र, ऑनलाईन की ऑफलाईन आणखी पत्र प्राप्त नाही. सद्यस्थितीत शाळा बंद आहेत. जिल्हा अनलॉकमध्ये असला तरी शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत शासनस्तरावरून निर्णय होईल, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, याची काळजी घेण्यात येईल. - सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.