बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु पाणंद रस्ते व्यवस्थित नसल्याने शेतमाल घरापर्यंत पोहोचेल की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या कुठे बैलगाडी फसते; तर कुठे शेतमाल अडकतो, असा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहे. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी लाखो रुपये निधी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत खर्च करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांसमोर अद्यापही रस्त्यांचा प्रश्न आ वासून आहे. सुरुवातीला काही भागात लोकवर्गणीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती; परंतु त्यातही अतिक्रमणाचा खोडा आल्याने अनेक रस्ते अर्धवट राहिले आहेत. दरम्यान, पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्ता कामासाठी निधी देण्यात आला; परंतु जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. दोन आठवड्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या या पावसाने आता पाणंद रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. सध्या शेतमाल घरी आणणे म्हणजे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शेतात पायी जाणेही झाले कठीण
माझ्या घरापासून ते शेतापर्यंत जवळपास तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे; परंतु हा रस्ता अत्यंत अरुंद व चिखलमय झालेला असल्याने या रस्त्याने बैलगाडी नेणे तर अवघडच साधे पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे.
गणेश देशमुख, शेतकरी.
बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले
परिसरात पाणंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पाणंद रस्त्यातच बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणंद रस्त्यावर मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.
योगेश नाईक, शेतकरी.
५८५ कि.मी., ३५० रस्ते...
जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. यामध्ये ५८५ किमी लांबीचे ३५० रस्ते बनविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे; परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
एका शिवारातच नव्हे, सर्वत्रच चिखल
पाणंद रस्त्याचा हा प्रश्न एखाद्याच शिवारात नाही, तर सर्वत्रच आहे. सध्या पावसाने पाणंद रस्त्यावर चिखल निर्माण होणे, साहजिक आहे; परंतु काही ठिकाणी त्या रस्त्याने बैलगाडीही चालवता येत नसल्याचे दिसून येते.
शासनदरबारी पाठपुरावा सुरू
जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निवेदनही देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांअभावी शेतात जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.
राजेंद्र पळसकर, कृषी सभापती, जिल्हा परिषद बुलडाणा.