नीलेश जोशी
बुलडाणा : आपआपल्या सत्ताकेंद्राचा राजकारणासाठी खुबीने वापर करत आपल्या विरोधकांना चित करण्यात येथील राजकीय नेत्यांकडून नेहमीच सफाईदारपणे चाली खेळण्यात येतात. त्यामुळेच चिखली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची लढाई कशी असले याबाबत कमालीची उत्सुकता असते. काँग्रेसचे विद्यमान आमदार राहूल बोंद्रे यांच्या ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ च्या तळ्यात-मळ्यातील भूमिकेमुळे ते सध्या येथील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
सातत्याने सुरू असलेल्या विकास कामांचे भूमीपूजन, महादेवाला मार्ग दाखविण्यासाठी घालण्यात आलेल्या साकड्यांमुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकारण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत होता. मात्र, प्रारंभी काहीशा दबक्या आवाजात सुरू असलेल्या आ. राहूल बोंद्रे यांच्या पक्षांतरांच्या वावड्यांनी अचानक घेतलेल्या व्यापक स्वरुपामुळे विरोधकांमध्येही काहीसी चलबिचलता वाढली होती. त्यामुळे येथे प्रारंभी धडाक्यात सुरू असलेले विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रम काहीसे सुस्तावले होते. राहूल बोंद्रेंच्या संदर्भातील अफवांमध्ये किती सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी बुलडाण्यासाठी हायकमांड असलेल्या मुकूल वासनिक यांना थेट जिल्ह्यात येऊन चर्चा करावी लागली, यातच सगळे आले. त्यामुळे सध्या एक संवेदनशील मतदारसंघ म्हणून चिखलीकडे बघितल्या जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चिखलीत कोणता राजकीय भूकंप होते याकडे सध्या राजकीय धुरीणांचे लक्ष लागून आहे.
भाजपकडून सध्या चिखलीत जिल्हा परिषद सदस्य असलेल्या श्वेता महाले, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य असलेले अॅड. विजय कोठरी यांचा उमेदवारीसाठी प्रबळ दावा असल्याचे बोलले जात आहे. या व्यतिरिक्त भाजपमध्येच असलेले सुरेशअप्पा खबुतरे, संजय चेके पाटील, प्रारंभीचे शिवसेनेत असलेले व नंतर भाजपवासी झालेले प्रतापसिंग राजपूत यांनी तिकीटासाठी फिल्डींग लावण्याचे प्रयत्न केले आहेत. नाही म्हणायला येथून शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य पाहता शिवसेनेच्याही महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. मात्र शिवसेनेचे प्रबळ दावेदार म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ते काँग्रेसचे नेते व आता पुन्हा शिवसेनेत दाखल झालेले प्रा. नरेंद्र खेडेकर हेही शिवसेनेकडून भविष्य आजमावण्यास कालपर्यंत तयार होते. मात्र मध्यंतरी शिवसेनेच्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या मुलाखतीमध्ये बुलडाण्याचे इच्छूक म्हणून प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी मुलाखत दिली. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या चिखली विधानसभा मतदारसंघ हा भाजपाला सुटल्यासारखेच आहे.
एकंदरीत परिस्थितीचा विचार करता काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे यांनाच अद्याप स्पष्ट मार्ग दिसलेला नसल्यामुळे व अफवांचे पेव पाहता चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय धुरीणांची स्थिती सध्या बुचकाळ््यात पडल्यासारखी आहे. त्यामुळे सिमोलंघनादरम्यान येथील वास्तविक चित्र स्पष्ट होईल, असा होरा आहे. एक गोष्ट मात्र निश्चित मानावी लागले ती राहूल बोंद्रे यांनी येथील संभ्रमावस्थेचा व्यवस्थित फायदा घेत आपण प्रकाशझोतात कसे राहू याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसते.एकंदरीत चिखलीतील राजकीय घडामोडी पाहता येथील राजकीय समकिरणे येत्या काळात कोणते वळण घेतात याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे.