चिखली : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचे कारभारी कोण, यावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर आजच्या मतमोजणीची सर्वांना उत्सुकता लागून आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण तयारी झाली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
चिखली तालुक्यातील मुदत संपलेल्या एकूण ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, यातील पाच ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची अविरोध निवड झाली आहे. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये ७६.८४ टक्के मतदारांनी हक्क बजावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. एकूण ६० ग्रामपंचायतींच्या २०२ प्रभागांमधील ५५८ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, १ हजार ११८ उमेदवार या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत, तर ५५८ जागांपैकी १४३ उमेदवार यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले आहे. दरम्यान, मतदानानंतर निकालाची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे. मतमोजणी चिखली तालुका क्रीडा संकुलात पार पडणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अजितकुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे.
अशी होणार मतमोजणी
६० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतमोजणीसाठी १५ टेबल असणार आहेत. सकाळी १०च्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर प्रारंभी पोस्टल व सैनिक मतदान मोजल्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होणार आहे. यासाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी, एका टेबलवर एक पर्यवेक्ष, सहायक कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई कर्मचारी आदी सुमारे ६० अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत.
गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर येणार ताण
तालुक्यातील एकूण ५५८ जागांसाठी १ हजार ११८ उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे प्रतिनिधी व समर्थक असे प्रत्येकामागे किमान १० जण आणि गावचा निकाल ऐकण्यासाठी येणारे नागरिकांची संख्या त्यात सोमवारी चिखलीच्या आठवडी बाजारासाठी होणारी गर्दी पाहता, प्रचंड मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेवर मोठा ताण राहणार आहे.
कॅप्शन : मतमोजणीची तयारी करताना अधिकारी, कर्मचारी.