लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ५५ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. सत्ता स्थापनेसाठी नऊ सदस्यांची जुळवाजुळव करणारा डोणगावचा नवा कारभारी ठरणार आहे. दरम्यान, नव्या शिलेदाराबद्दल अनेकांना उत्सुकता लागून आहे.
डोणगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचे आठ उमेदवार विजयी झाले, तर शिवसेना या पक्षाचे सात जण विजयी झाले व दोन अपक्ष उमेदवार विजय झाले. एकूण १७ सदस्य असलेल्या डोणगाव ग्रामपंचायतमध्ये सत्तास्थापनेसाठी ९ सदस्यांचे बहुमत असणे आवश्यक आहे. त्यामुळे डोणगाव येथील सत्तासूत्रे ही अपक्षांच्या हाती गेल्याचे जरी दिसत असले तरी, मात्र वेळेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी, शैलेश सावजी व राजेंद्र आखाडे व माजी सरपंच संजय आखाडे हे काय भूमिका घेतात. तसेच शिवसेनेचे विद्यमान कृषी सभापती राजेंद्र पळसकर, अॅड. रामेश्वर पळसकर व मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. डोणगाव ग्रामपंचायतीवर यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व होते. त्यानंंतर शिवसेनेने सत्ता काबीज केली केली . दरम्यान, निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी झाले तर, शिवसेनेचे केवळ सातच उमेदवार विजयी झाले व शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने दोन शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले. आता हे दोन अपक्ष कुणाला साथ देणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असतानाच संपूर्ण जिल्ह्याचे चित्र बदलविणारे माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी व जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव डोणगावात काय करिष्मा करून आपापल्या पक्षाचा झेंडा ग्रामपंचायतवर फडकविणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
-----------