ऑनलाइन लोकमत/विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. 18 - 27 नाव्हेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून याठिकाणी प्रचाराचा धडाका पाहायला मिळतो आहे. जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी काही नगरपालिका निवडणुकीत तिरंगी तर चौरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, चिखली, देउळगाव राजा, मेहकर, नांदूरा, मलकापूर, या 9 नगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. मतदानाला केवळ 9 दिवस शिल्लक असल्यामुळे प्रचाराने वेग घेतला आहे. प्रत्येक उमेदवाराचे प्रचाररथ सर्वत्र फिरत असून, ठिकठिकाणी सभांचेही आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोणत्याच पक्षाने युती केली नसल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षांसह बसपा, एमआयएम, भारिप बहुजन महासंघ, अपक्ष या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत विजयी होण्यासोबतच पाडा-पाडीचे राजकारणही मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे विजयी होण्यासाठी उमेदवार उभे राहतातच मात्र त्यासोबतच काहींना पाडण्याकरिताही अनेक उमेदवार रिंगणात उतरतात किंवा उतरवले जातात. जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये सध्या मतदारांना हाच अनुभव येत आहे. काही नगर पालिकांमध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. तर काही ठिकाणी भारिप व एमआयएमच्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे.
बुलडाणा नगर पालिकेत अध्यक्षाच्या एका जागेकरिता 15 जण रिंगणात आहेत तर 27 जागांसाठी 182 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपकडून कुंदा पाटील, शिवसेनेच्या पुजा गायकवाड, राष्ट्रवादीच्या अनिता शेळके, काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी काकस या चौघांमध्ये चौरंगी लढत होणार आहे. यासोबतच भारिपच्या तिकिटावर असलेल्या उमेदवार यांना मुस्लीम व दलित नागरिकांचे मतदान मिळाले तर त्या बाजी मारू शकतात.देउळगाव राजा नगर पालिका मतदारसंघात शिवसेना भाजपाने युती केली असून, तिरंगी लढतीचे चित्र आहे. भाजपा व शिवसेनेच्या उमेदवार सुनिता शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलावती खांदेभराड व काँग्रेसच्या मिना दराडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
मेहकरमध्ये काँग्रेसचे उमेदवार कासम गवळी आहेत तर शिवसेनेच्यावतीने भाष्करराव गारोळे, भाजपचे प्रल्हादअन्ना लष्कर, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अॅड. लक्ष्मण फोकरे तर एमआयएमच्यावतीने शेख चांद कुरेशी रिंगणात आहेत. यामध्ये प्रमुख लढत काँग्रेसचे कासम गवळी, शिवसेनेचे भाष्करराव गारोळे व एमआयएमचे शेख चांद कुरेशी यांच्यामध्ये होणार आहे.
खामगावमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाने आघाडी केली आहे. या आघाडीच्या उमेदवार शांताबाई सोनोने व भाजपाच्या उमेदवार अनिता डवरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. शेगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी बुरूंगले, भाजपच्या शकूंतला बूच, प्रहारच्या तिकिटावर असलेल्या माधुरी देशमुख व शिवसेनेच्या कुसूम हाडोळे या रिंगणात आहेत. या चौघांमध्येच लढत होणार आहे. नांदूरा, मलकापूर व चिखली नगर पालिकेतही तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. उमेदवार आपआपल्या परीने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
असे आहेत अध्यक्षपदाचे उमेदवार
बुलडाणा 15
देउळगाव राजा 11
चिखलीत 11
मेहकर 9
खामगाव 5
जळगाव जामोद 5
मलकापूर 18
शेगाव 12
नांदूरा 9