- नीलेश जोशी
बुलडाणा: गेल्या निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघावर काँग्रेसने झेंडा फडकविला. शिवसेनेकडून हा मतदारसंघ ताब्यात घेतांना काँग्रेसने सेनेला चवथ्या क्रमांकावर टाकले तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे आता युतीमध्ये भाजपाने या मतदारसंघावर प्रबळ दावा केला असून युतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला मिळतो यावरच मतदारसंघाचे गणित ठरणार आहे.
तीन लाख ४,९५१ मतदार संख्या असलेला बुलडाणा विधानसभा मतदारसंघ असून अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ हे येथे आमदार आहेत. न दिसणारी शाश्वत विकास कामे त्यांनी केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. परंतू ही कामे प्रत्यक्षात मतांच्या रुपात परावर्तीत करण्याचे कसब त्यांना साधावे लागणार आहे तर मोताळा तालुक्यातील काही भागात त्यांच्या विरोधात नाराजीचा सुर आहे. त्यामुळे यंदा त्यांनाही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मोठा जोर लावावा लागणार आहे. आघाडी निश्चित झाल्यात जमा असल्याने काँग्रेसला राष्ट्रवादीकडून अपेक्षित साथ मिळण्याची अपेक्षा आहे.
शिवसेनेने स्वबळाची चाचपणी सुरू केली असली तरी तब्बल सहा जण बुलडाण्यातून इच्छूक असून परवा मुंबईत तब्बल ३२ जणांनी बुलडाण्यातून उमेदवारी वर दावाकरत मुलाखती दिल्या. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी किती मुळापर्यंत गेली आहे हे वेगळे सांगणे नको. त्यातच माजी आमदार विजयराज शिंदे विरुद्ध अन्य असा शिवसेनेतच येथे अंतर्गत संघर्ष आहे. यात जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड, माजी जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे किंवा चिखलीचे रहिवाशी मात्र बुलडाण्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यापैकी कोणाच्या गळ््यात उमेदवारीची माळ पडते यावर गणिते अवलंबून आहे. परंतू त्यात बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा युतीत भाजपाला सुटतो की सेनेला हा कळीचा मुद्दा आहेच.
युती न झाल्यास चित्र वेगळे राहील. त्या पृष्ठभूमीवरच शिवसेनेतून ३२ जण इच्छुक असताना भाजपमाधून अवघे नऊ जण इच्छूक आहेत. त्यातल्या त्यात गतवेळचे पराभूत उमेदवार योगेंद्र गोडे, वर्तमान भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हे प्रबळ दावेदार आहेत. भाजपच्या अतंर्गत सर्व्हेमध्ये १७५ जागांपैकी स्ट्राँग होल्ड असलेली व विजयाची खात्री म्हणून गणल्या जाणारी जागा म्हणून बुलडाण्याकडे बघितल्या जाते, असा दावाच भाजपकडून केल्या जात आहे. दूसरीकडे भाजपा व शिवसेनेने स्वबळाची चाचपणी केलेली आहेच. यामध्येच वंचित बहुजन आघाडीनेही आता उडी मारली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थेट जिल्हा कार्यालय उघडून वंचितने विधानसभा मतदारसंघात आपल्याबाबतच्या चर्चेस प्रारंभ करून टाकला आहे.चार मतदारसंघात शिवसेनेचा अंतर्गत सर्व्हेमध्यंतरी युवा सेनेचे आदित्य ठाकरे हे बुलडाणा जिल्ह्यात जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आले होते. त्यांच्यासोबतच्या लवाजम्यात मोठी गर्दी होती. दरम्यान, याच कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात एका संस्थेच्या माध्यमातून चिखली, सिंदखेड राजा, मेहकर आणि बुलडाणा विधानसभा मतदार संघात गुप्तपद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्याची चर्चा आहे. ग्रामपातळीवर जावून थेट काही जणांशी संवाद साधत हे सर्व्हेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसभराचे रिपोर्टींग त्यामाध्यमातून गोळा केल्या गेले होते. अगदी संबंधीतांनी वापरलेली गाडी किती किलोमीटर चालली याचेही आकडे दक्षिणेतील एका मोठ्या शहरात बसलेले कंपनीचे अधिकारी घेत होते. त्यामुळे हा सर्व्हेही बुलडाण्यात कोणाच्या पथ्थ्यावर पडतो हे बघण्यासारखे आहे.