लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळवून देणे हेच सुकाणू समितीचे ध्येय असून, ते साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार रविवार १६ जुलै रोजी येथे आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.सुमारे ५० संघटनांचा समावेश असलेल्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बुलडाणा जिल्हा शाखेच्यावतीने येथे शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. दादा रायपुरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुकाणू समितीचे मुख्य निमंत्रक डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा निष्कर्ष या बैठकीत निघाला. सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देणाऱ्या सरकारने प्रत्यक्ष कर्जमाफी देताना मात्र निकष व अटींचा रतीब घातला. त्यामुळे प्रत्यक्षात या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल, याबाबत शंका आहे. ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सरकारकडून सांगितले जाते. ९० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचा दावाही केला जात आहे; मात्र ही आकडेवारी फसवी असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील व डॉ. अजित नवले यांनी केला. विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये, असा प्रश्न रघुनाथदादा पाटील यांनी उपस्थित केला. संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा गर्भित इशाराही यावेळी दिला.कर्जमाफीबाबत सुकाणू समितीशी बोलणी करताना सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. गणेश जगताप पुणे, सत्यशोधक किसान सभेचे किशोर धमाले, किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे, डॉ. दादासाहेब कविश्वर, कॉ. किसन गुजर, सुशिलाबाई मोराळे, ज्योत्स्ना विसपुत्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, देवेंद्र देशमुख, डॉ. विप्लव कविश्वर आदींची उपस्थिती होती.