आधीच महागाईने नाकीनऊ आलेल्यांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची महागाई सहन करावी लागत आहे. महिन्याआधी गॅस सिलिंडर २५ रुपये व पंधरा दिवसांआधी पुन्हा २५ रुपयांनी महागले होते. आता पुन्हा सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. हे सिलिंडर ९०५ रुपयांना मिळत आहेत. सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी गृहिणींकडून करण्यात येत आहे.
सबसिडी किती मिळते हो भाऊ?
गॅस सिलिंडरवर सुरुवातीपासून सबसिडी मिळत होती. यामुळे गोरगरिबांना सिलिंडर विकत घेणे परवडत होते. परंतु मे २०२० पासून सिलिंडरवर सबसिडी मिळणे बंद झाले आहे. काहीच जणांना ३-४ रुपये सबसिडी मिळते. मात्र, कोरोना काळापासून सबसिडी बंद असली तरी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला वाढ सुरूच आहे.
महिन्याचे गणित कोलमडले!
सिलिंडरसाठी जास्त रक्कम चुकवावी लागत आहे. यामध्ये सबसिडीही बंद झाली असून, फ्लॅटमध्ये राहात असल्याने चूल पेटविणेही शक्य नाही.
- शालिनी विनोद डोंगरे, गृहिणी.
किराणासोबत आता गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ होत आहे. पंधरा दिवसांत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. शहरात राहात असल्याने महागडे सिलिंडर घेतल्याशिवाय पर्याय नाही.
- आरती कैलास गोलाईत, गृहिणी.
दर महिन्याला नवा उच्चांक
दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर
१ डिसेंबर १० ७०१
१ जानेवारी ३० ७३१
१ फेब्रुवारी २३ ७५४
१ मार्च १५ ७६९
१ एप्रिल १२ ७८१
१ मे ३१ ७९३
१ जून ०६ ८२४
१ जुलै २५ ८५५
१ ऑगस्ट २५ ८८०
१ सप्टेंबर २५ ९०५
व्यावसायिक सिलिंडरही महाग
दरवाढीचा परिणाम घरगुती सिलिंडरसोबत व्यावसायिक सिलिंडरवरही झाला आहे. आधी १,६८२ रुपये ५० पैशांना मिळणाऱ्या सिलिंडरच्या दरात पंधरा दिवसांआधी ६ रुपये वाढ झाली होती. त्यामुळे तो १,६८८ रुपये ५० पैशांना मिळत होता. आता तोही सिलिंडर महागला आहे.