गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे एसटी महामंडळाला खूप मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र दुसऱ्या लाटेमुळे यावर्षी मार्च महिन्यात बसफेऱ्या पुन्हा बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक कामांसाठीच प्रवास करण्यास मुभा होती. संसर्ग होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली. मात्र, आता दुसरी लाटही ओसरली असून, रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अजूनही बससेवा बंद आहे. आता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. बस बंद असल्याने या विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास होत आहे.
जिल्ह्यातील एकूण बस : ४७०
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या : ३,५००
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या : १०००
खेडेगावांमध्ये जाण्यासाठी खासगीचा आधार
खेड्यातील नागरिकांना बससेवा कमी असल्यामुळे खासगी वाहन, काळीपिवळी व रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहनाने प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो; परंतु नाइलाजाने त्या वाहनांचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.
सध्या जवळपास सर्वच बस सुरू केल्या असून, संसर्ग कमी झाला असला तरी टप्प्याटप्प्याने बससेवा सुरळीत करण्यात येईल. शाळा सुरू झाल्यामुळे बसदेखील सुरू कराव्या लागणार आहेत.
-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.
खेडेगावावरच अन्याय का?
कोरोना रुग्णसंख्या कमी होऊनदेखील ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली नाही. गावातील प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाव तिथे एसटी फक्त नावापुरतेच राहिले आहे, असे म्हणावे लागेल.
-विश्वनाथ तिजारे, शहापूर, प्रवासी.
कोरोनामुळे एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेनंतर अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, अतिरिक्त भाडे द्यावे लागत आहे.
-शेख युनूस, लाखनवाडा, प्रवासी.
हजारो कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहराचाच!
दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात जवळपास अडीचशे बस सुरू झाल्या असून, लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी बस धावत असून, उत्पन्न सध्या जेमतेम होत आहे. प्रवासी अद्यापही म्हणावे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघताना दिसत नाहीत.