लोकमत न्यूज नेटवर्क
दुसरबीड- उष्णतेची लाट आली असून, उष्णतेमुळे मनुष्यांनासुद्धा घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना जंगलामध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हे वन्यजीव पाण्याचा शोध घेत रानोमाळ भटकत असून, पाण्याचा शोध मात्र लागत नाही, उलट विहिरीमध्ये पडून त्याच प्रमाणे रोडवरून जाताना अपघात होऊन अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
जंगलामध्ये वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता पाणवठे त्याचप्रमाणे पाझर तलाव अशी अनेक योजना राबवून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले असताना काही ठिकाणी पाणवठा किंवा पाझर तलावामध्ये पाणी दिसून येत नाही. वृक्ष लागवडसुद्धा नावाला केली जाते. बीबी बीट अंतर्गत येत असलेले गाव पोफळ शिवणी हनवतखेड याठिकाणी जंगलामध्ये अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली. रोजगार हमीच्या कामांमध्ये गरजू रोजगारांना रोजगार न देता केवळ पैसे काढण्यापुरती नावे वापरून शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याबद्दल अनेक वेळा परिक्षेत्र अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा या कामाबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही, अशा प्रकारचेच या मेहकर परिक्षेत्रामध्ये अनेक कामे असून, हे त्यातील एक उदाहरण आहे; मात्र २०१८ ते १९ या वर्षामध्ये थातूरमातूर कामे करून शासनाचा निधी लाटण्याचे अनेक प्रकार आहेत; मात्र या कामाकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते. याच वन्य जिवांना वन क्षेत्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असती तर यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागली नसती आणि अनेक प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले नसते. वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.