बुलडाणा : जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या झापाट्याने वाढत आहे; मात्र सूर्य आग ओकत असताना या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये हे वास्तव पुढे आले. जंगलातील नैसर्गिक पाणवठय़ांशिवाय यावर्षी नव्याने एकही पाणवठा वनविभगाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार हे अभयारण्य ३३0३४.0२ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातीचे हजारो वन्यप्राणी आहेत; मात्र एप्रिल, मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना, या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे गरजेचे असताना यावर्षी मे महिन्यापर्यंत अभयारण्यात एकही नवा पाणवठा तयार केला नव्हता. या अभयारण्यात मागील वर्षी वन्यप्राण्यांसाठी सुमारे १0४ पाणवठय़ांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये टँकरद्वारे नियमित पाणी टाकण्याचे काम वनविभागाला करावे लागते. तथापि, एकदा कागदावर पाणवठे तयार झाले म्हणजे त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. दुसरीकडे मात्र या पाणवठय़ावर कागदोपत्री नियमित टँकरद्वारे पाणी पडत असल्याचे सांगितले जात आहे.
वन्यप्राण्यांना पाणवठय़ांची वानवा
By admin | Published: May 11, 2015 2:13 AM