संग्रामपूर ता. प्र:- दर वर्षी श्रावण महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी महागिरी येथे महादेवाच्या यात्रेला हजारोच्या संख्येने भक्तगण येत असतात. शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे. वन्यजीव विभागाने महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला परवानगी नाकारल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात सातपुडा पर्वतरांगेत महागिरी येथे दरवर्षी श्रावण महिण्यातील तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा मोठ्या हर्षोल्हासात भरते. येथील एका उंच पर्वतावर भगवान शंकर यांची पूरातन स्थापना झालेली आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले अतिप्राचीन दुर्गम भागात महागिरी येथील भगवान शंकर आदिवासींसह पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. हे ठिकाण संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा किलोमीटर अंतरावरील अती दूर्गम भागात आहे. पर्वतरांगेतील एका भव्य पर्वताच्या टोकावर जमिनीपासून जवळपास ७ हजार फूट उंचीवर महादेवाचे अधिष्ठान वसलेले आहे. त्या पर्वताला महादेवाचे पर्वत असे म्हटले जाते. या पर्वताच्या उंची वर महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी ७ हजार फूटाची एकेरी पाऊलवाट आहे. त्या पाउलवाटेनेच महादेवाचे दर्शन घडत असून दर्शनासाठी येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भक्तगणांची गर्दी पाहायला मिळते. या भव्य पर्वतावर एक मोठी दगडाची गूफा असून या गूफेच्या आत मध्ये भगवान शंकराची स्थापना केलेली आहे. निसर्गाची देण असलेल्या सातपुड्यातील नैसर्गिक सौंदर्य व निसर्गरम्य ठिकाणी दर्शनासाठी भक्तगणांची एकच गर्दी असते. शेकडो वर्षापूर्वी सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज महागिरीला गायी चारण्याकरिता जात होते. अशी आख्यायिका आहे. महागिरी महादेव सोनाजी महाराजांचे श्रद्धास्थान होते. महादेवाचे पर्वत चढत असतांना सोनाजी महाराजांच्या पादुकांची पूरातन स्थापना करण्यात आलेली आहे. सातपुडा पर्वतरांगेत संत सोनाजी महाराज गायी चारत असतांना त्यांना महागिरीवर महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी केशवदास ऋषीच्या रूपात सोनाजी महाराजांना दर्शन दिले. रानमोळा गाई चारत असतांना सहकाऱ्यांना तहान लागली की सोनाजी महाराज चमत्कार करून पाण्याचा झिरा निर्माण करत. सातपुडा पर्वत रांगेत अनेक ठिकाणी आजही पाण्याची जिवंत झिरे आहेत. महादेवाच्या पर्वतावरही श्री संत सोनाजी महाराज यांनी लावलेला जिवंत झिरा आजतागायत सुरू आहे. त्यामुळे या स्थळाला अधिक महत्त्व असल्याने दर वर्षी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येते. टेकडीवर जातांना कुठेही पाण्याची साठवण दिसत नाही. मात्र ज्या ठिकाणी महादेवाची स्थापना आहे. त्या ठिकाणी बाराही महिने पाणी साचलेले आढळून येते. गुफेच्या दगडातून एक एक थेंब पाणी टपकून येथे पाण्याची साठवण होते. ज्या ठिकाणी पाणी आढळते नेमक्या त्या ठिकाणावरून मंदिरात जाण्याचा रस्ता आढळून येते. तो जुन्याकाळी लाकडाच्या शिडीवर असल्याचे बोलल्या जाते. भावीक खडतर प्रवास करून या ठिकाणी आल्यावर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत भगवान शंकराचे दर्शन घेतात. मात्र यावर्षी कोरना विषाणू संसर्गामुळे महागिरीच्या यात्रेला वन्यजीव विभागाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे श्रद्धालूंकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यातील महागीरी वर जाण्यास परवानगी नाही. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडून आदेशही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महागिरी यात्रेला परवानगी देण्यात आली नाही.
सूहास कांबळेवनपरिक्षेत्र अधिकारी(वन्यजीव विभाग) सोनाळा