लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : ग्रामपंचायतीच्या काळात जीर्ण व नादुरुस्त झालेली व ठिकठिकाणी लिकेज झालेली जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर वन्यजीव विभागाकडून परवानगी मिळावी, अशी मागणी नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांनी बुलढाणा जिल्हा काॅंग्रेस संपर्कमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोणार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या देऊळगाव कुंडपाल काळे पाणी पुरवठा योजनेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या अंतर्गत बुडीत क्षेत्रामध्ये जॅकवेल घेणे, आर. सी. सी. ब्रिज पम्पिंग मशिनरी बसवणे आणि लोणार शहरापर्यंत नवीन पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करणे, या स्वरूपाचा प्रस्ताव आहे. यामध्ये प्रामुख्याने १,४०० मीटर पाईपलाईन ही लोणार अभयारण्य क्षेत्रातून जात असल्याने ही पाईपलाईन टाकण्याकरिता वन्यजीव विभाग, अकोला यांच्याकडे न. प.ने परवानगी मागितली आहे. त्या संदर्भातील परवानगी वन्यजीव विभागाकडून नाकारण्यात आली. पालिका या योजनेंतर्गत कोणतेही नवीन काम अभयारण्य क्षेत्रामध्ये करणार नसून, जुन्या अस्तित्वात असलेल्या ठिकाणीच नवीन पाईपलाईन टाकण्याकरिता परवानगी मागितली होती. तसेच अभयारण्यातील कोणत्याही मोठ्या वृक्षाची हानी होणार नाही तसेच काही ठिकाणी झालीच तर परत त्याचठिकाणी वृक्ष लागवड करुन त्याची देखभाल करण्याबाबत मुख्यधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नसून, केवळ पाईपलाईन काढण्याकरिता ३ फुटांपेक्षा जास्त खोदकाम करण्यात येणार नाही तसेच खोदकाम केलेल्या ठिकाणी जुनी पाईपलाईन बदलून नवीन टाकण्यात येईल, जेणेकरून इजेक्टा ब्लँकेटला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. याकरिता वन्यजीव विभागाकडून मंत्रालयीन स्तरावर परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी पाटोळे यांनी या निवेदनातून केली आहे.