किनगाव जट्टू : किनगाव जट्टू परिसरासह वसंत नगर, देवा नगर, खापरखेड या परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. उगवलेली पिके वन्य प्राणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे.
किनगाव जट्टू परिसरातील शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. आधीच पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी उगवली नाही़ थाेडी फार उगवलेले पीक वन्य प्राणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राेहीचे कळप शेतातून मुक्त संचार करीत असल्याने नुकत्याच उगवलेल्या पिकांचे नुकसान हाेत आहे़ किनगाव जट्टूसह परिसरात मृग नक्षत्र पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. महागडे बी, बियाणे, रासायनिक खत आणून शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी इतर खरीप हंगामातील पिकाची लागवड केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली हाेती दरम्यान, २७ जून राेजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांची शेत जमिनी पाण्याखाली आल्याने जमिनी खरडल्या हाेत्या. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाल्यानंतर वन्य प्राण्यांकडूनही माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ त्यामुळे, शेतकरी हवालदिल झाला आहे. या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
४० ते ५० राेहींच्या कळपाचा वावर
परिसरात ४० ते ५० राेहींच्या कळपाचा वावर आहे. राेही उभे पीक फस्त करीत असून त्यांच्या धुमाकुळामुळे पिकांचे नुकसान हाेत आहे़ किनगाव जट्टू व वसंतनगर शिवारातील शकुंतला माळवदे, यमुनाबाई चव्हाण, शंकर लांडगे, दादाराव सोरमारे तसेच
भिकाजी रांधवण, संजय खडके यांच्या साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची शेतकऱ्यांनी केली आहे.