- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. तर कृत्रिम पानवठ्यांची स्थिती चिंताजनक असून अनेक हातपंप बंद आहेत. यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातीलवन्यजीव तहानले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात हिवाळ्याच्या सुरूवातीपासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली होती. सध्या पाणीटंचाईवर प्रशासनाला चांगलेच काम लागले आहे. पाण्याचा थेंबही नसलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करणे, ज्याठिकाणी खासगी विहिरींना थोडेबहुत पाणी आहे, अशा विहिरी अधिग्रहीत करणे, यासारख्या उपायोजना पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येत आहेत. कमी पर्जन्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुके व २१ महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. तर १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळाच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी भागातच नाहीत; तर वन्यजीवांनाही बसत आहे. जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार यांसारखी मोठ-मोठी अभयारण्ये असून येथे वेगवेगळ्या प्रजातींचे असंख्य वन्य प्राणी अधिवास करतात. बुलडाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. या अभयारण्यात बिबट, हरिण, काळवीट, रानमांजर, जंगली कुत्रे, तरस, लांडगा, रानडुक्कर, नीलगाय, माकड, वटवाघूळ, अस्वल यांसारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात. स्थानिक तर काही स्थालांतरित अशा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अशा एकूण १५० प्रजाती या अभयारण्यात आढळून येतात. मात्र सध्या या अभयारण्यातील वन्यजीवांची पाण्यासाठी वाताहात होत आहे. येथे कृत्रीम पानवठे व नैसर्गीक पानवठे असूनही वन्यजीवांच्या घशाला कोरड पडत आहे.
हातपंप बंद!ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये कुत्रिम पानवठे ३८ आहेत. तर हातपंप सात आहेत, त्यातील तीन हापंपत सध्या सुरू आहेत. मात्र चार हातपंप बंद स्थितीत आहेत. नैसर्गिक पानवठ्यांमध्ये लाखेचा झिरा, काशी नळकुंड, लांब डोह, ऋषिबाचा खोरा यांचा समावेश आहे.
लोणार अभयारण्यातील पानवठे कोरडेलोणार अभयारण्यामध्ये विविध प्रजातीचे वन्यप्राणी आहेत. मात्र सध्या या अभयारण्यातील पानवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. यासंदर्भात वनसंरक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधता असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
या दुष्काळाच्या झळा वन्यजीवांनाही बसत आहेत. त्यांच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील उत्तर देव्हारी मधील पानवठा क्रमांक तीनची हापसी दुरुस्त करून देण्यात यावी तसेच अभयारण्यात इतर ठिकाणी असलेले हातपंप दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी वनविभागाकडे केलेली आहे. - नितिन श्रीवास्तववन्यजीव सोयरे, बुलडाणा.