खामगाव: ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला.
शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानावर आसूड यात्रा काढली आहे. ही यात्रा शुक्रवारी खामगाव येथे पोहोचली. खामगावातील मुख्य रस्त्यावर प्रहारने शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रहारचे संस्थापक आ. बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस आणि भाजप ही दोन्ही राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचेही आ. बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत पुत्राचा विजय झाला. त्यामुळे विधान परिषदेत पिता-पुत्र आमदार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता. ही परिस्थिती विधानसभेत आणि खामगाव मतदार संघातही ‘पिता-पुत्र’ आमदार असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दानवे हे दानवच!
बळीराजा असलेल्या शेतकऱ्यांना साले म्हणून उपमर्द करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे दानवच आहेत. शेतकºयांचा अपमान करण्याचा अधिकार दानवे यांना नाही. तथापि, पैसा आणि सत्तेच्या मस्तीत दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. हा अपमान अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. त्यासाठीच दानवेंच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात आली आहे.