बुलडाणा : जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. यासोबतच पोलीसदेखील दिवस-रात्र एक करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहेत. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याने कुटुंबातील मुलांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. याबाबतचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या योद्ध्यांच्या मुलांशी थेट संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मनातील गुपित ‘लोकमत’कडे व्यक्त केले. अनेक मुलांनी आपल्या वडिलांबद्दल समाधान व्यक्त केले. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अनेक डाॅक्टरांना काेविड केअर सेंटरमध्ये सेवा द्यावी लागत आहे. जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी काेराेनाबराेबर लढत आहेत. जबाबदारी वाढल्याने साहजिकच अनेक डाॅक्टर आणि पाेलीस आपल्या मुलांना फारसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक चिमुकल्यांना आपल्या वडिलांनी जाॅब साेडून घरीच आपल्याबराेबर खेळावे असे वाटते. तसेच काहींनी माेठे झाल्यानंतर काेराेना असेल तर डाॅक्टर हाेणार नसल्याचे सांगितले. काही मुलांना आपल्या वडिलांच्या सेवाकार्याचा अभिमान असल्याने लाेकसेवाच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काेट
लोकसेवा घडेल असेच काम करण्याची इच्छा आहे. काम कुठेही करता येते. परंतु वडील जे काम करतात यातून मिळणारे समाधान आणि आनंद वेगळा असताे. त्यामुळे वडिलांसारखेच पाेलीस बनून लाेकसेवा करण्याची माझी इच्छा आहे.
ज्ञानदा साेमनाथ पवार, किनगाव राजा
सध्या नियमांची अंमलबजावणी करताना पाेलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे पाेलीस विभागापेक्षा डाॅक्टर हाेण्याला मी पसंती देईन. वडिलांच्या नाेकरीचा अभिमान आहे. मात्र, कामाचा ताण पाहता पाेलीस हाेण्यासाठी माझी पसंती नाही.
वेदांत शिवदत्त वारे, मेहकर
पाेलिसांना कधीच सुट्या नसतात. कडक निर्बंध असताना इतर कर्मचारी सुटीवर आहेत. मात्र, पाेलिसांना संचारबंदीतही काम करावे लागते. त्यामुळे पाेलीस हाेण्याऐवजी दुसऱ्या विभागात नाेकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
नैतिक दत्तात्रय पठारे, मेहकर
पाेलिसांवर ताण असला तरी त्यांच्या कामाचा अभिमान आहे. काेराेना असाे किंवा दुसरी कुठलीही गाेष्ट असाे! पाेलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे पाेलीसच व्हायचे आहे.
राज गणेश लाेंढे, मेहकर
माझे वडील पोलीस असून, मला त्यांचा अभिमान आहे. ते आपले कर्तव्य कोणत्याही परिस्थितीत झोकून देऊन करतात. त्यामुळे मी पोलीस अधिकारीच हाेईन.
अर्णव नितीन खराडे, डोणगाव
मी दररोज पोलीस कर्मचारी यांची समाजाप्रती सेवा पाहतो. माझे वडीलही पोलीस असून, त्यांचा मला अभिमान आहे. कोरोना काळात पोलीस रस्त्यावर उभे राहून देशातील नागरिकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मी भविष्यात पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर होऊन समाजाची सेवा करेन.
सोहम विनोद इंगोले, डाेणगाव
काेराेना वाढल्यामुळे आई, वडील सहा महिन्यांतून एकदा भेटतात. त्यामुळे जाेपर्यंत काेराेना आहे ताेपर्यंत वैद्यकीय क्षेत्रात नाेकरी करायची नाही. वैद्यकीय क्षेत्रात आई, वडील काम करत असल्याचा अभिमान आहे. मात्र, त्यांनी नाेकरी साेडून आमच्याबराेबर राहावे, असे वाटते. मला आयपीएस व्हायचे आहे.
रूद्र किशाेरकुमार बिबे, बुलडाणा
काेराेना वाढल्यापासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे काेराेना असेल तर मला डाॅक्टर व्हायचे नाही. दुसऱ्या विभागात नाेकरी करायला मी प्राधान्य देईन. वडील डाॅक्टर असल्याचा मला अभिमान आहे.
भक्ती सुनील भराडे, मेहकर
काेराेना आला तेव्हापासून वडील जास्त वेळ देऊ शकत नाहीत. काेराेनाच्या संकटात ते लाेकांना वाचवण्यासाठी धडपड करीत असल्याचा अभिमान आहे. मात्र, आयएसएस, आयपीएस हाेण्याची माझी इच्छा आहे.
आराध्य मनीष धारतकर