लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शासनाने पूर्वी असलेला वॅट कर ५ टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. या विरोधात वाइन बार असोसिएशनने सोमवारी संप पुकारला. शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून उपविभागीय कार्यालयावर सोमवारी दुपारी निदर्शने केली. उपविभागीय अधिकार्यांमाफर्त जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद केले की, राज्य शासनाने करवाढ ही अन्यायकारक असून, महाराष्ट्रातील बार असोसिएशनला विश्वासात न घेता करण्यात आली आहे. टॅक्स ५ टक्क्यांकवरून वाढवून १० टक्के केल्यास राज्यातील परमिट रूम धारक संकटात येईल. त्यामुळे दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून खामगाव शहर आणि परिसरातील वाईन बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही निवेदनात नमूद केले. या निवेदनावर वाइन बार असो. अध्यक्ष अरविंद मुळीक, सचिव कृष्णासिंह ठाकूर, बंटी गौर, किशोर गरड, ओंकारआप्पा तोडकर, योगेश जाधव, देशमुख यांच्यासह वाइनबार असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षरी आहेत.