लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्मशानभूमीतील अघोरी पूजेमुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली. प्रेतात्मा जागृत करण्यासाठी ऐन मध्यरात्री ही अघोरी पूजा करण्यात आल्याच्या चर्चेमुळे परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. दरम्यान, काही नागरिकांनी हिमतीने स्मशानभूमीत प्रवेश केला असता, तीन मांत्रिक मृतात्म्यांच्या शांतीसाठी ही पूजा करताना आढळून आले.मलकापूर शहरातील स्मशानभूमीत रात्री मेणबत्त्या पेटविण्यात आल्या. यावेळी मांत्रिकांचा मंत्रतंत्रांचा आवाज ऐकून स्मशानास लागून असलेल्या माता महाकालीनगरातील लोक भयभीत झाले. त्यानंतर वस्तीतील नागरिक गटाने स्मशानभूमीत गेले तेव्हा तेथे प्रेत जाळण्याच्या ठिकाणी काळे कपडे घातलेले तीन मांत्रिक जादूटोण्यासाठी असलेले विविध साहित्यासह मृत आत्म्यांना शांती मिळो यासाठी पूजा-अर्चना करताना दिसले. हा प्रयोग करत असल्याचे नागरिकांना आढळून आले. यामध्ये डॉ. अशोक गोठी यांचे पुत्र आशिष गोठी आणि मांत्रिकांचा समावेश होता. वडिलांच्या व भावाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पूजाअर्चा केल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले. मात्र, अवेळी पूजेचे कारण विचारले असता आशिष गोठीची भंबेरी उडाल्याने, तसेच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. तीन मांत्रिक व आशिष गोठी यांना ताब्यात घेऊन कार्यवाहीसाठी पोलिसांनी शहर पोलीस स्टेशनला नेले.
मुख्य मांत्रिक छत्तीसगडचा... अघोरी पूजा करणारा मांत्रिक छत्तीसगड येथील असून तीन मांत्रिकांवर कलम ११०/११७ प्रमाणे तर आशिष गोठी याच्यावर कलम १८८ अशी प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी दाखल केल्याचे समजते. घटनास्थळी काळे कपडे घालणारे ते तीन इसम मांत्रिक असल्याची चर्चा जनमानसात होत आहे.