विवेक चांदूरकर, खामगाव : महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी - सीइटी पीसीएम आणि ट्रिपल आयटी परीक्षेचे हॉल तिकीट्स उपलब्ध झाले असून, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या दोन्ही परीक्षा ४ मे ला एकाच दिवशी आहेत. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली आहे.
२८ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एमएचटी - पीसीएम या विषयांसाठी होणारी सीईटीची परीक्षा २ ते १७ मे २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या पत्रानुसार २५ ते ३० एप्रिलपर्यंत होणार होती. ही परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याने देशभरातील हजारो विद्यार्थी आणि पालकांनी ४ मे रोजी होणाऱ्या ट्रीपलआयटी हैद्राबाद प्रवेश परीक्षा देण्याकरिता अर्ज केले आहेत. आता ४ मे रोजी एमएचटीसीइटी पीसीएम परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी ट्रीपलआयटी हैदराबादच्या परीक्षाही आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेची संधी गमवावी लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी केलेली अभ्यासाची मेहनत, अमूल्य वेळ, परीक्षा फी, श्रम आणि महत्त्वाचे म्हणजे करिअरची संधी गमवावी लागणार आहे. नीट युजीप्रमाणेच सीईटी पीसीएम परीक्षेची वैयक्तिक कारणास्तव तारीख बदलण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक प्रा. संजय व्यवहारे, प्रा. दीपक भिंगारदेवे, प्रा. विजय पांडे , शिशीर पाटील, डॉ. अजय खर्चे, अरुण मिरगे आदींनी केली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना करिअर आणि शैक्षणिक संधी प्राप्त होईल. नीटच्या विद्यार्थ्यांना तारीख बदलाचा दिला पर्यायज्या विद्यार्थ्यांची ५ मे रोजी नीट परीक्षा आहे आणि एमएचटी सीइटीही पीसीएम परीक्षा त्याच दिवशी आहे. ती रद्द करून त्यांना वैयक्तिक कारणांसाठी दिनांक बदलण्याचा पर्याय दिला आहे. ज्याप्रमाणे नीट यूजीच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव एमएचटी सीइटी पीसीएम परीक्षेची तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ट्रीपल आयटी हैद्रबाद परीक्षा विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव सीईटी पीसीएम तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा.- किशोर वाघ,पालक, चिखली