लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथील ढासाळवाडी तलावात ऑक्टोबर महिन्यात तब्बल पाच भाविकांचे मृत्यू झाले. या तलाव परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने तहसीलदार सुरेश बगळे यांनी बुधवारी तलावर परिसराची पाहणी केली. वर्षभरात ढासाळवाडी येथील तलाव दहा ते १२ भाविकांचे प्राण घेत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. धोकादायक ठरणार्या या तलाव परिसरात सुरक्षात्मक उपाय गरजेचे आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वीच जालना येथील एका भाविकाचा यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानुषंगाने येथे आता उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाहणीदरम्यान, पंचायत समिती सदस्य चाँद मुजावर, दीपक सोर, गणेश वानखेडे, शेख मुस्ताक, दिनकर शेवाळे उपस्थित होते.
कपड्यांचा गुंता जीवघेणासैलानी दर्गा येथे दर्शनासाठी येणारे भाविक या तलावात स्नान करतात. सोबतच त्यांच्या अंगावरील वापरलेले कपडे तलावातच सोडून देतात. त्यामुळे तलावात कपड्यांचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. १९८0 च्या दशकात निर्माण झालेल्या या तलावात मोठय़ा प्रमाणात गाळही साचलेला आहे. दोन्हीच्या एकत्रित परिणामातून पाण्यात गेलेल्या व्यक्तीचा या गुंत्यात अडकून मृत्यू होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातच बेशरमची झुडुपे ही येथे चारही दिशांना वाढल्यामुळे आपतकालीन स्थितीत मदत करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे हा गाळ आणि साचलेले जुने कपडे काढून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. व्यंकटेश ग्रुपचे पाटील हे काम मोफत करणार आहे.