मोताळा(बुलडाणा) : थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने ३९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास तळणी शिवारात घडली. भारती सुनील खराटे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
माेताळा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी सुनील ओंकार खराटे यांच्या तळणी शिवारातील शेतात रविवारी तूर काढणीचे काम सुरू होते. त्याकरिता गावातीलच ट्रॅक्टर (एम.एच. ३४- ५५०९) व थ्रेशर मशीन लावलेली होती. दरम्यान, शेतकरी सुनील खराटे यांची पत्नी भारती खराटे या थ्रेशरच्या मागे तूर जमा करीत असताना, थ्रेशरच्या पीटीओ शॉपमध्ये त्यांचे केस अडकल्याने त्या थ्रेशर मशीनमध्ये ओढल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. खराटे दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी मिलिंद बोदडे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाॅ प्रल्हाद वानखेडे, पोकाॅ ज्ञानेश्वर धामोडे करीत आहेत.