खामगाव: खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना एका ३६ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी खासगी रूग्णालयात एकच गर्दी केली. डॉक्टरांवर कारवाईसाठी रूग्णालयात ठिय्या दिला. यामुळे नांदुरा रोडवरील एका रूग्णालयातील वातावरण रविवारी चांगलेच तापले होते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील अटाळी येथील यास्मीन बी अजिस खान नामक महिलेला गत तीन चार दिवसांपूर्वी डॉ. सदानंद इंगळे यांच्या हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. सोनोग्राफ्रीत महिलेच्या पोटात साडेतीन महिन्याचा एक मृत आणि दुसरा आणखी एक गर्भ आढळून आला. त्यानुसार रूग्णालयात उपचार सुरू असताना, अशक्तपणा आणि रक्त कमी असल्यामुळे या महिलेला शनिवारी रक्त चढविण्यात आले.
दरम्यान, रविवारी या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रूग्णालयात धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही राजकीय पुढारीही येथे पोहोचले. त्यामुळे नांदुरा रोडवरील वातावरण चांगलेच तापले होते. याप्रकरणी शहर पोलीसांनी आकस्िमक मृत्यूची नोंद केली असून पोलीस बंदोबस्तात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. तत्पूर्वी शे. राजीक शे. रहीम यांनी माध्यमांसमोर दिलेल्या प्रतिक्रियेत शे. राजीक शे. रहीम रा. अटाळी यांनी महिलेचा रक्तदाब वाढल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असून डॉक्टरांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे नमूद केले. यावेळी महिलेचे पती अजीजखान सत्तार खान उपस्थित होते.
महिला रूग्णालयात उपचार घेत होती. तिच्या पोटात एक मृत गर्भ आणि एक जीवंत गर्भ होता. शनिवारी तिला रक्त देण्यात आले. रक्तदाब वाढल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याची माहिती पोलीसांना दिली आहे. डॉ.सदानंद इंगळे