लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील खेर्डा खुर्द येथे निराधार दिव्यांग महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणातील आरोपी रितेश देशमुख याला फाशी द्यावी अन्यथा हैद्राबादप्रमाणे त्याला तात्काळ गोळ्या घालाव्या अशी मागणी ९ डिसेंबर रोजी जळगाव जामोद येथे महिलांच्या विविध संघटनांनी निषेध मोर्चा काढून केली. मोर्चात महिलांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. स्थानिक दुर्गा चौकामधून मोचार्ला सुरुवात झाली. दुपारी एक वाजता हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. येथे जय मल्हार सेनेच्या रंजना बोरसे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अॅड. ज्योती ढोकणे, काँग्रेस पक्ष नेत्या डॉ. स्वाती वाकेकर, नगराध्यक्षा सीमा डोबे, अपर्णा कुटे, लता तायडे, चंदा पुंडे, मीना सातव, पार्वती इंगळे, उषा धंदर, माधुरी राणे, सविता कपले, सविता देशमुख यांच्यासह प्रसेनजित पाटील व इतर मान्यवरांनी मोर्चाला संबोधित केले. खर्डा येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून धनगर समाजातील एका असहाय्य महिलेची अत्याचार करून हत्या झाली. हे अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे, अशा प्रतिक्रीया उमटल्या. या घटनेचा निषेध करण्यात आला. सरकारने योग्य ती पावले उचलावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. धनगर समाजातील महिला शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना निवेदन दिले. तीन महिन्याच्या आत नराधमाला फाशी द्यावी, आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.(प्रतिनिधी)
दिव्यांग महिला खून प्रकरण: जळगाव जामोदमध्ये निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 3:46 PM