नीलेश जोशी, बुलढाणा, मेहकर : मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिच्या पतीकडून ३५ लाख रुपये घेण्यासोबतच महिलेस चिखलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मेहकर पोलिसांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील संजय तुकाराम जाधव (रा. उकीरखेड) आणि संदीप प्रभाकरराव वानखेडे (रा. लावणा, ता. मेहकर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. २० मार्च रोजी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी मेहकर पोलिसांनी एक पथक पाठवले आहे.
संजय तुकाराम जाधव (४०, रा. उकीरखेड, ता. रिसोड) आणि संदीप प्रभाकरराव वानखेडे (४८, रा. लावणा, ता. मेहकर) यांनी पीडित महिला व तिच्या पतीकडून मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ३५ लाख रुपये घेतले होते. सोबतच पीडित महिलेस चिखली येथील विश्रामगृहाजवळ बोलावून एका बंद खोलीत नेत संदीप वानखेडे याने तिला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. दुसरा आरोपी संजय जाधव याने याचे चित्रीकरण केले. ही घटना २०२० मध्ये घडली होती. दरम्यान आरोपींनी त्यावेळी केलेले बलात्काराचे चित्रीकरण आता समाजमाध्यमावर टाकून महिलेची बदनामी केली, अशी तक्रार महिलेने २० मार्च रोजी पोलिसांत केली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी संजय तुकाराम जाधव व संदीप प्रभाकरराव वानखेडे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास मेहकर पोलिस करत आहेत.
पोलिसांचे पथक संभाजीनगरच्या दिशेने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या शोधासाठी ठाणेदार राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेले असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास स्वत: ठाणेदार राजेश शिंगटे हे करीत आहेत.