नायगांव दत्तापूर : कंबरखेड-गौंंढाळा येथील अर्धवट असलेल्या पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी महिलांनी ९ मार्च राेजी मेहकर ते जानेफळ रस्त्यावर हंडे घेउन रास्ता राेकाे आंदाेलन केले.
नायगाव दत्तापूर येथून जवळच असलेल्या कंबरखेड-गौंंढाळा गावातील ग्रामस्थांनी २८ फेब्रुवारी रोजी मेहकर येथे या विषयीची निवेदन प्रशासनाला दिले हाेते. ८ मार्चच्या आत काम पूर्ण करण्याची मागणी निवेदनात केली हाेती. त्यामुळे सदर काम पूर्ण न झाल्यामुळे ९ मार्च रोजी महिला व पुरुष यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत, मेहकर-जानेफळ रोडवर एसटी बस थांबवत संबंधित ठेकेदाराच्या विरोधात महिलांंनी हंडे घेऊन रास्ता रोको केला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अंतर्गत गट ग्रामपंचायत कंबरखेड अंतर्गत गौंढाळा या गावातील विविध विकास कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत, तसेच अनेक कामे अर्धवट, अपूर्ण सोडलेले आहेत. या संपूर्ण कामाची चौकशी करून लवकरात लवकर कामे पूर्ण करून देण्यात यावी, तसेच पेवर ब्लॉकचे अर्धवट अपूर्ण कामे सोडलेली आहेत. या संपूर्ण कामाची चौकशी करून कामे पूर्ण करून देण्यात यावी, तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाइ करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली हाेती. त्यामुळे ९ मार्च रोजी महिलांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी उपस्थित कंबरखेड-गौंढाळा गट ग्रामपंचायत सरपंच ताई गजानन जाधव, लता अरुण निकस, शोभा विनोद खरात, स्वाती राहुल जाधव, रोहिणी अनिल जाधव, सुमित्रा संदीप जाधव, विनोद खरात, गजानन धोंडगे, संदीप जाधव, प्रकाश वानखेडे, शिवाजी जाधव, वासुदेव गाढवे, कळणू जाधव, भूषण सरदार, बळीराम जाधव आदी उपस्थित होते.
संबंधित ठेकेदार ए.जी. कंस्ट्रक्शन, औंरगाबाद यांना पत्राद्वारे या विषयीची माहिती कळविण्यात आली आहे. ग्रा.पंचायत मागणीनुसार गावातील कामे पूर्ण करून देण्यात यावे, या विषयीचे एमएसआरडीसी मेहकर विभागामार्फत त्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
दिनकर शिंदे
(उपअभियंता, एमएसआरडीसी, मेहकर)