डोणगाव: आरेगाव-डोणगाव मार्गावर कळसकरवाडीनजीक आरेगावकडून डोणगावकडे जाणाऱ्या वाहनाने वीज खांबासह महिलेस धडक देऊन जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता आरेगावकडून डोणगावकडे येणारे वाहन क्रमांक एमएच-२८-व्ही-९३७१च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. यामध्ये वीजेचा खांब तुटून वाहनावर पडला. याच वेली तेथून रस्त्याच्या बाजूने पाणी घेऊन जाणारी कल्पना दीपक बदर (२७, रा. डोणगाव) या महिलेलाही या वाहनाने धडक दिली. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे तिला तत्काळ डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी महादू गणपत बदल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहन चालक संजय कळसकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण खनपटे हे करीत आहेत.
भरधाव वाहनाची महिलेस धडक; औरंगाबादमध्ये उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 4:48 PM