२१ जुलै २०२० रोजीची ही घटना होती. कोरोनामुळे देऊळगाव राजा परिसरातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याचे कुटुंबीयही कोरोनाबाधित असल्याने अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास येण्यास त्यांची अडचण होती. त्यातच त्यावेळी देऊळगाव राजामध्ये पाऊसही जोरदार पडत होता. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये पार्थिव नेताना ते गावातून न्यावे लागल्यामुळे जनमानसाचाही प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला होता. स्मशानभूमीमध्ये संबंधितावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध होता. एकंदरीत विपरीत परिस्थिती आणि पालिकेचे कर्मचारीही धास्तावलेेले. यातून नेमका मार्ग कसा काढणार, असा प्रश्न महिला अधिकाऱ्यांसमोर होता.
शेवटी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आसमा शाहीन यांनी स्वत: पीपीई किट घालून स्मशानभूमी गाठली. दोन्ही महिला अधिकारी आल्याचे पाहून पालिकेचा एक कर्मचारीही मग पुढे आला व त्यांनी तिघांनी मिळून त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. थेट कर्तव्यातून सकारात्मकतेचा संदेश या तीन महिला अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे त्यांचे प्रशासकीय पातळीवरही कौतुक करण्यात आले.
--अंत्यसंस्कार करण्याबाबत होती समस्या--
कोरोना मृतकावर अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून जिल्ह्यात अनेक ठिकाणी विरोध होता. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती होती. अनेक मृतकांचे नातेवाईकही समोर येत नव्हते. त्यामुळे बुलडाण्यातील स्मशानभूमीमध्ये अनेकांवर अंत्यसंस्कार करावे लागले होते. देऊळगाव राजा येथील या महिला अधिकाऱ्यांच्या धाडसामुळे जनमासनात काही प्रमाणात बदल घडून आला होता.