येथील जिजाऊनगरमधील महिलांनी तीन वर्षांपूर्वी बचत गटाची स्थापना केल्यानंतर परिसरात घरगुती पद्धतीने अन्नपदार्थ तयार करणाऱ्या महिलांना संधी देण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, बचत गटामार्फतत सर्व प्रकारचा व दर्जेदार किराणा सामान एकाच छताखाली उपलब्ध असल्यास त्यास हमखास ग्राहक मिळतील. शिवाय याद्वारे बचत गटाद्वारे निर्मित वस्तू, घरगुती उत्पादने ठेवल्यास त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध होईल, या हेतूने गत दिवाळीच्या मुहूर्तावर चिखलीत मुख्य रस्तावर मॉलची उभारणी केली. महिला बचत गटाने घेतलेल्या भरारीची दखल घेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी २३ जानेवारी रोजी मॉलला भेट दिली. याप्रसंगी सर्व महिलांचे कौतुक करीत सर्वतोपरी सहकार्याची भावाना शिंगणे यांनी व्यक्त केली. येत्या काळात मॉलमार्फत महिलांनी तयार केलेली उत्पादने, उत्पादक, शेतकरी यांचा माल साफसफाई, दर्जेदार प्रतवारी युनिट उभे करून आकर्षक पॅकींगसह विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे व बाजारपेठ मिळवून देणार असल्याची माहिती उत्कर्ष महिला बचत गटांच्या महिलांनी पालकमंत्री यांना दिली. यावेळी नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, संजय गाडेकर, भाऊराव शिंगणे, उत्कर्ष महिला बचत गटाच्या अध्यक्षा क्रांती वानखेडे, सचिव सोनाली साखरे, कावेरी सवडतकर, नलिनी पाटील, चंद्रकोर पाटील, शीला भुसारी, कावेरी खपके, आशा कणखर, मंदा लांबे, शीला भूतेकर, संध्या जाधव, रेखा सोरमारे, इंदू मोरे आदी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
मासिक बचतीतून उभारले भांडवल
सुमारे तीन वर्षांपूर्वी जिजाऊनगर, चिखली येथील महिलांनी उत्कर्ष महिला बचत गटाची स्थापना केल्यानंतर मासिक बचत करून स्वभांडवल उभारले. यातून पहिल्यावर्षी गव्हाची खरेदी-विक्री केली. मसाले, पापड, लोणची, चटण्या आदी पदार्थ तयार करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील अनेक होतकरू, गरजू महिला, बचत गटांची माहिती मिळवून त्यांच्या उत्पादनाला आकर्षक पॅकींग, प्रतवारी, फूड लायसन्स, व बाजार मिळवून देण्यासाठी महिला बचत गट प्रयत्नशील आहे.