बुलडाणा : महिलांचे हित आणि कल्याण जपणाऱ्या कायद्यांचा महिलांनी सदुपयोग करावा. त्याचा दुरूपयोग टाळावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी येथे केले.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, कौटुंबीक न्यायालय आणि जिल्हा वकील संघाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ८ ते २० मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सह. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. डी. पंजवाणी, दिवाणी न्यायाधीश सीमा पडोळीकर, सरकारी वकील सोनाली सावजी, कौटुंबीक न्यायालयाचे विवाह समुपदेशक जगन्नाथ कांबळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे, सचिव अमर इंगळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश चित्रा हंकारे पुढे म्हणाल्या की, अलीकडील काळात कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बहुतांश कायदे हे महिलांसाठी केंद्रीत असले तरी त्याचा दुरूपयोग होणार नाही, ही बाब कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. यासोबतच कायद्यातील बारकावे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. सह. दिवाणी न्यायाधीश एस. डी. पंजवाणी यांनी महिलांचे कौटुंबीक हिंसाचारापासून संरक्षण तर सह. दिवाणी न्यायाधीश सीमा पडोळीकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ यासह अन्य विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. सरकारी वकील सोनाली सावजी यांनीही महिलांच्या कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी गर्भलिंग चाचणी कायद्यांबाबतचे बारकावे पीपीटीद्वारे दाखविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वादानंतर समेट घडवून आणण्यात आल्यानंतर पुन्हा सुखाने नांदणाऱ्या जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व आपल्या कामात अग्रेसर असलेल्या महिलांचा सत्कारही करण्यात आला. त्यामध्ये डॉ. लता बाहेकर, पोलीस निरीक्षक अलका निकाळजे, क्रीडा क्षेत्रांतील गायत्री अहेर, नृत्य क्षेत्रातील नयन इंगळे, सामाजिक क्षेत्रात कार्यरत साहिना पठाण, डॉ. गायत्री सावजी यांच्यासह अन्य महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौटुंबीक न्यायालयातील विवाह समुपदेशक जगन्नाथ कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीची महत्त्वाची भूमिका निमंत्रक म्हणून जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश साजिद आरिफ सय्यद यांनी पार पडाली. सूत्रसंचालन अलका निकाळजे यांनी केले. आभार कुंदन सदानशिव यांनी मानले. कृषी विभागाच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला.