चिखली : सवणा गावात खुलेआम विकल्या जाणार्या दारुमुळे येथील महिलांनीएकत्र येत महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात अवैधपणे दारू विक्री करणार्यांची जिल्हा पोलिस अधिक्षकासंह, चिखली पोलिस स्टेशन, विभागीय पोलिस आयुक्त व गृहमंत्री ना.आर.आर.पाटील यांच्याकडे तक्रार दिली आहे.तालुक्यातील सवणा येथे अवैध दारू विक्री होत असल्यामुळे काही महिलांचे पती व वयात आलेली मुले व्यसनाधीन झाले आहेत. शिवाय दारू पिऊन महिलांना मारहाण करणे आदी अत्याचार वाढले असून गावातील लग्न समारंभ इतर सार्वजनिक कार्यक्रमात भांडण-तंटे वाढले आहेत. तसेच जुगार व लुडो सारखे खेळ खेळण्याचा प्रकार वाढीला लागला आहे. असे असतानाही चिखली पोलिस स्टेशनचे याकडे दूर्लक्ष असल्यामुळे राजरोसपणे दारू विक्रीचा व्यवसाय होत असल्याचा आरोप महिलांनी तक्रारीत केला असून गाव दारूमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे व गावातील दारू विक्री व जुगार यावर पायबंद घालावा अशी मागणी केली आहे. या तक्रारीवर शकुंतलाबाई, आदमानेबाई, लिलाबाई धारे, सविता हाडे, सुनिता तायडे, केसरबाई गुरव, तारामती गायकवाड, मीरा गवारे, भिकाबाई चोपडे, रेणुका शिंदे, लिलाबाई सुलाखे, गयाबाई देव्हडे, गिता दातार आदी १३५ महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.
दारूबंदीसाठी सरसावल्या महिला
By admin | Published: September 03, 2014 12:19 AM