- अनिल गवई
खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदार संघातील पुरूष मंडळी मतदान करण्यात (मातृशक्तीच्या तुलनेत) एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येते. बुलडाणा लोकसभेतील सर्वच सहा विधानसभा मतदार संघात पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी ही महिलांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदानात मातृशक्तीचे पाऊल मागे पडत असल्याची चर्चा होत आहे.
लैगिंक समानतेच्या दृष्टीकोनातून मातृशक्तीच्या उत्थानासाठी देशभर प्रयत्न होत आहेत. समान अधिकारामुळे सर्वच क्षेत्रात मातृशक्तीचे पाऊल पुढे पडतेय. शिक्षण क्षेत्रातही महिला आघाडीवर आहेत. मात्र, राजकीय क्षेत्रासोबतच मतदानाच्या टक्केवारीत मातृशक्ती कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मातृशक्तीच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेत. मात्र, मतदानाच्या टक्केवारीत महिला पुरूषांच्या तुलनेत खूप मागे असल्याची वस्तुस्थिती उपलब्ध आकडेवारीवरून समोर येते. बुलडाणा लोकसभा मतदार संघात १७ लक्ष ५८ हजार ९४३ एकुण मतदार आहेत. यामध्ये ०९ लक्ष २१ हजार ६३३ पुरूष तर ०८ लक्ष ३७ हजार ३०२ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघात गुरूवारी ११ लक्ष १७ हजार ४८६ मतदारांनी मतदाना हक्क बजावला. त्याची टक्केवारी ६३.५३ आहे. यामध्ये ०६ लक्ष ७८२ पुरूष मतदारांनी म्हणजेच ६५.१९ टक्के पुरूषांनी तर ०५ लक्ष ६७ हजार ७०३ म्हणजेच ६१.७१ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यावरून पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी ३.४८ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येते. हीच परिस्थिती बुलडाणा लोकसभा मतदार संघातील सर्वच सहा विधानसभांमध्येही कायम असल्याचे दिसून येते.
सखी मतदान केंद्रे मातृशक्तीकडून बेदखल!
लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभाग वाढविण्यासाठी तसेच महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, यासाठी या निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच ‘महिला व्यवस्थापित मतदान’ केंद्राची संकल्पना राबविण्यात आली. त्याअनुषंगाने देशातील प्रत्येक शहरात एक सखी मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले. पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये महिलांनाच प्राधान्य देण्यात आले. मात्र, सखी मतदान केंद्रच महिलांकडून बेदखल करण्यात आल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.
चौकट...
अशी आहे पुरूष आणि महिलांच्या मतदानाची टक्केवारी
विधानसभा पुरूष महिला
बुलडाणा 56.70 53.97
चिखली 64.21 61.17
सिंदखेड राजा 65.06 62.38
मेहकर 66.19 63.02
खामगाव 69.62 65.67
जळगाव जामोद 69.88 64.73
एकुण 65.19 61.71