आधी बैलजोडी व लाकडी अवजारे यांच्या साहाय्याने शेती करणारा शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. त्यात ट्रॅक्टर, शेती कामासाठी लागणारी लोखंडी अवजारे बाजारात उपलब्ध होत असून, या अवजारांचा मोठ्या प्रमाणात शेतीत वापर होऊ लागला आहे. परिणामी आधी शेतीत सर्वत्र वापरात येणारे लाकडी अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करणे, वखरणी करणे, हे केव्हाच इतिहास जमा झाले आहे.
अलीकडच्या काही वर्षांपासून लाकडी वखर, नागर, तिफन, कोळपे, दुसा, आदी शेती उपयोगी अवजारे काळ्या मातीतून काढता पाय घेऊ लागली आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडत चालली आहे.
शेतीकामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे आता दिसेनाशी होऊ लागली आहेत. लाकडी अवजारांची वाढती किंमत, मजुरी व दुरुस्ती खर्च अवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले अथवा मातीच्या संपर्कामुळे त्यांना उधई लागते. त्यामुळे तुलनेने वापरायला सोईची असणाऱ्या लोखंडी अवजारांनी शेतीमध्ये चांगलाच जम बसविल्याचे चित्र सध्या बुलडाणा तालुक्यासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.