बुलडाणा, दि. १६- शरद पौर्णिमेची चंदेरी रात्र. आल्हाददायक हवेने आसमंतात पसरलेला थंडावा..दर्दी रसिकांची उपस्थिती. राज्यातील प्रख्यात मराठी गजलकारांची शब्दसुरांच्या चांदण्याची बरसात. अन् मित्रांगण परिवाराचं भव्य आयोजन, अशा मंत्रमुग्ध करणार्या वातावरणात शनिवारी येथील एका मंगल कार्यालयाच्या सभागृहात मराठी गीत - गजलांची कोजागिरी साजरी झाली. हिंदी मुशायरांच्या धर्तीवर प्रथमच पार पडलेल्या या मराठी मुशायर्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गजलकार शिवाजी जवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी, लेखक, उर्दू गझलकार रवींद्र इंगळे चावरेकर यांची उपस्थिती होती. नितीन देशमुख अमरावती, नीलेश कवडे अकोला, एजाज खान साखरखेर्डा, जयदीप विघ्ने दे. राजा, सुरेश इंगळे, रमेश आराख बुलडाणा. या रांगड्या गजलकारांनी मैफिलीला रंगात आणले तर अकोला येथील गोपाल मापारी यांच्या निवेदनाने या मैफिलीला चार चांद लावले. यावेळी जमलेल्या प्रमुख अतिथीमध्ये वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव बाविस्कर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, मुंबई येथील महसूल आयुक्त विश्वास मुंडे, बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा परिषद लेखापाल अधिकारी शिल्पा पवार, वर्धमान अर्बनचे अध्यक्ष जितेंद्र जैन, नामदेवराव जाधव, अशोक काळे, प्रा. डॉ. सिद्धेश्वर नवलाखे, राजेंद्र काळे, संदीप शुक्ला, हर्षनंदन वाघ, अरुण सुसर, रविकिरण टाकळकर, नरेंद्र लांजेवार, अरविंद पवार, प्रा. जयप्रकाश कस्तुरे, तुळशीराम मापारी, अँड. सतीशचंद्र रोठे, गजानन नाईकवाडे आदींचा समावेश होता. संचालन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार आनंद संचेती यांनी मानले.
कोजागिरीच्या रात्री शब्दसुरांची बरसात
By admin | Published: October 17, 2016 2:23 AM