खामगाव - जालना रेल्वेमागार्चा प्रश्न हा तब्बल ११० वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ-मराठवाड्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जिल्ह्याच्या एकंदरीत विकासासोबतच कृषी आणि इतर उद्योगांना चालना देण्यासाठी हा मार्ग अत्यंत लाभदायक आहे. आजपासून खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या तांत्रिक सर्व्हेला सुरुवात झाली याचा आनंद असल्याचे मत रविकांत तूपकर यांनी व्यक्त केले. या रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील जनतेला अनेक वेळा रस्त्यावर उतरावे लागले, रेल्वे लोक आंदोलन समितीला अनेकवेळा आंदोलने करावी लागली. परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला, पण जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागले. या रेल्वेमार्गाच्या तांत्रिक सर्व्हेला सुरुवात झाली, ही बाब स्वागतार्ह आहे, परंतु केवळ सर्व्हे होऊन पुन्हा हा मार्ग थंडबस्त्यात न पडता इतर तांत्रिकबाबी पूर्णत्वास जाऊन २०२१ मध्ये या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळून जलदगतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे, अशी अपेक्षा रविकांत तूपकरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी ''स्वाभिमानी''चे राणा चंदन, शे.रफिक शे. करीम, सहदेव लाड, गोपाल जोशी, रामदास खसावत, नेहरूसिंग मेहर, अनिल मोरे, गणेश इंगोले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात व्हावी : रविकांत तूपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:52 AM