सिंदखेडराजा : येथील नव्याने होऊ घातलेल्या कोविड रुग्णालयाची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली आहेत. या रुग्णालयाची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी पाहणी केली. कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कोविड रुग्णालय करण्याच्या हालचाली गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होत्या. जागेची निश्चिती होत नसल्याने हे रुग्णालय सुरू होण्यास विलंब झाला असला तरीही पुढील आठ दिवसांत हे रुग्णालय कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काजी, विभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता बिराजदार, पोलीस निरीक्षक जयवंत सातव, शिवाजी राजे जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. औषध कक्ष, पाण्याची व्यवस्था, शौचालय, आदी व्यवस्था उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी या सर्व कामांची पाहणी करून आरोग्य विभागाला तातडीने कामे पूर्ण करून हे रुग्णालय कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ऑक्सिजनचे ३० बेड तयार
सिंदखेड राजा येथे पुरातत्व विभागाच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतीत हे रुग्णालय होत असून, सध्या येथे ऑक्सिजनचे ३० बेड तयार करण्यात आले आहेत. जंबो ऑक्सिजन प्लांटमधून येथे ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे. एकूण शंभर बेड असलेल्या या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.